करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यापासून गरीब विद्यार्थांच्या शिक्षणापर्यंत विविध प्रकारची मदत तो करत आहे. दरम्यान एका व्यक्तीने त्याच्याकडे चक्क निवडणूकीच्या तिकिटाची मागणी केली. त्याच्या या मागणीवर सोनूने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

“सोनू सूदजी मला बिहारमधील भागलपुर येथून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आमदार बनून मला लोकांची सेवा करायची आहे. कृपया तुम्ही मला भाजपामधून एक तिकिट मिळवून द्या.” अशी मागणी एका व्यक्तीने सोनूकडे केली. या आश्चर्यचकित करणाऱ्या विनंतीवर “माझ्या भावा, बस, ट्रेन आणि प्लेन व्यतिरिक्त मला कुठलंही तिकिट देता येत नाही” असं गंमतीशीर उत्तर त्याने दिलं आहे. सोनूचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.