बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत शक्य होईत तितकी गरजू लोकांची मदत करताना दिसून येतोय. इतकंच नव्हे तर गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी देखील त्याने केंद्र व राज्य सरकारकडे केलीय. करोना काळात लोकांच्या मदतीसाठीची धडपड अशीच सुरू ठेवत त्याने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय.

आतापर्यंत करोना काळात लोकांना आधार देत असतानाच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरिबांचा ‘मसिहॉं’ बनलाय. त्यानंतर आता त्याने आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्याने एक शिष्यवृत्ती योजना देखील लाँच केलीय. ‘संभवम’ असं या शिष्यवृत्ती योजनेचं नाव आहे. सोनू सूदने स्वतः ट्विट करत ही माहिती दिलीय.

या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, “आयएएसची तयारी करायची आहे…आम्ही घेऊ तुमची जबाबदारी…’संभवम (SAMBHAVAM)’ च्या लाँचिंगची घोषणा करताना खूप आनंद होतोय…सूद चॅरिटी फाउंडेशन आणि दिया दिल्ली हा यांचा संयुक्त उपक्रम आहे.” या ट्विटसोबतच सोनू सूदने एक फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये मोफत प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीय. या फोटोमध्ये त्याने लिहिलंय, ” इच्छुक उमेदवारांसाठी मोफत आयएएस प्रशिक्षण शिष्यवृत्ती देईल, असं मी तुम्हाला वचन देतो.”

सोनू सूदच्या उपक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सुरवातीला एक अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३० जून आहे. http://www.soodcharityfoundation.org/ या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज उपलब्ध आहे.

करोना काळात सोनू सूद न थकता लागोपाठ लोकांच्या सेवेत राहत आहे. पण आता लोकांच्या सेवेसाठीचे आयएएस अधिकारी घडवण्याचं कौतुकास्पद काम करणार असल्यानं त्याच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर भरभरून कौतूक केलं जातंय. नुकतंच सोनूने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट शेअर केलंय. यात त्याने लिहिलं, “जेव्हा आयुष्य तुम्हाला भरपूर पैसा देत असेल तर फक्त लिव्हिंग नाही तर गिव्हिंग स्टॅण्डर्ड सुद्धा वाढवलं पाहीजे.”