देशभरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अभिनेता सोनू सूद यानेही आज पंजाबमधील अमृतसर येथे करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच त्याने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवातही केली आहे. या मोहिमेला त्याने ‘संजीवनी’ असे नाव दिले आहे.

‘संजीवनीः अ शॉट ऑफ लाईफ’ या नावाने सोनूने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम तो करणार आहे.

याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, “लोक अजूनही विचार करत आहेत लस घ्यायला हवी की नको. त्यामुळे या विषयावर जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मला ही मोहिम सुरु करावीशी वाटली. प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या सदस्यांना, जे कोणी लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांना लस घेण्यासाठी उद्युक्त करायला हवं. यामुळे आपण भविष्यात ज्या समस्यांना तोंड देणार आहोत, त्यासाठी मदत मिळेल.”

तो पुढे म्हणाला, “पंजाबमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तसंच गावांमध्ये आम्ही सध्या ही मोहिम राबवत आहोत. इतरही अनेक राज्यांमध्ये काम सुरु आहे. लोकांमध्ये जागरुकता नसल्याने लस घ्यावी की नाही याबद्दल लोक अजूनही संभ्रमात आहेत. म्हणूनच मला सर्वांसमोर लस घ्यायची होती आणि सर्वांना हा संदेश द्यायचा होता की जास्त विचार करत बसू नका. अनेक शिबिरांच्या माध्यमातून आम्ही हे काम करू. या चळवळीच्या साहाय्याने आम्हाला लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायची आहे.”

करोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रत्येक भारतीयापर्यंत योग्य ती माहिती पोचवण्याचं काम ही मोहिम करणार आहे.