रेश्मा राईकवार

समाजसेवेतून बदललेल्या प्रतिमेमुळे ‘पेप्सी’कडून करारबद्ध; सलमान खानऐवजी झळकणार

टाळेबंदीच्या काळात ‘स्थलांतरितांचा त्राता’ ही प्रतिमा बनलेला सोनू सूद आपल्या समाजसेवेमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातींसाठी नवा चेहरा बनला आहे. समाजमाध्यमांवर सर्वच स्तरातील कौतुकामुळे ‘पेप्सी’ कंपनीने त्याला करारबद्ध केले आहे.

रांगडा अभिनेता सलमान खान आतापर्यंत ‘पेप्सी’च्या जाहिरातीत झळकत होता. मात्र नव्या जाहिरातीत त्याऐवजी सोनू सूद दिसणार आहे. टाळेबंदीच्या कालावधीत स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी बसेस, गाडय़ांची तरतूद करत त्यांच्या पाठी ठाम उभा राहिलेला सोनू आणखीही

काही जाहिरातींमध्ये लवकरच झळकणार आहे. त्याचबरोबर त्याच्या राजकारण प्रवेशाविषयीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  टाळेबंदीच्या काळात सलमानने केलेली पेप्सीची नवी जाहिरातही टीव्हीवर झळकली होती. मात्र टाळेबंदीतील समाजसेवेमुळे सर्वत्र बोलबाला झालेला सोनू सूद या जाहिरातीसाठी नवा नायक म्हणून पुढे येत आहे.

झाले काय ?  सोनूची लोकप्रियता लक्षात घेत पेप्सीने आपल्या नव्या इन्स्टाग्राम कॅ म्पेनसाठी त्याची निवड केली.  सोनूच्या कारकीर्दीतील हे सर्वात मोठे ब्रॅण्ड कॅ म्पेन आहे. ‘पेप्सी’सारख्या मोठय़ा ब्रॅण्डला मी त्यांचे प्रतिनिधित्व करू शकतो, असे वाटले हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे सोनूने सांगितले. सध्या आणखी काही मोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातींसाठी विचारणा झाली असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

लवकरच राजकारणात?

स्थलांतरित मजुरांचा मोठा वर्ग सध्या सोनूच्या पाठीशी असल्याने लवकरच तो राजकारणात प्रवेश करेल किंवा मोठय़ा पक्षाच्या प्रचारकार्यात सहभागी होईल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अद्याप अभिनय क्षेत्रात बरेच काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाले की  इतर गोष्टींचा विचार करेन. सध्या जे लोक माझ्या राजकारण प्रवेशाविषयी चर्चा करत आहेत ते त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करत आहेत, असे त्याने सांगितले. मात्र भविष्यात काय होईल याची कल्पना नाही, असे म्हणत त्याने राजकारण प्रवेशाची शक्यताही सूचित केली.