अभिनेता सोनू सूद लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनून आला. हाती काम नसणाऱ्या, राहायला घर नसणाऱ्या या मजुरांना गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतोय. या मजुरांना लहान पोराबाळांसोबत, कुटुंबीयांसोबत पायी चालताना पाहून फार दु:ख व्हायचं, असं म्हणत सोनू सूदने त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करू लागला. खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनलेल्या सोनू सूदचा मुंबई लोकल ट्रेनचा पास सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१९९७ मध्ये ४२० रुपयांचा हा रेल्वेचा पास सोनू सूदने घेतला होता. त्यावेळी तो २४ वर्षांचा होता. हा रेल्वेचा पास शेअर करत एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘ज्या व्यक्तीने स्वत: संघर्ष केला आहे, तोच दुसऱ्यांच्या समस्यांना समजू शकतो. सोनू सूद ४२० रुपयांच्या पासने लोकल ट्रेनचा प्रवास करायचा.’ विशेष म्हणजे सोनू सूदनेही सोशल मीडियावर ही पोस्ट पाहिली. त्याने त्यावर प्रतिक्रियासुद्धा केली. ‘हे आयुष्य गोल आहे’, असं म्हणत त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘मित्रा, प्रवास तर आतासुद्धा सुरू आहे. फरक फक्त इतकाच आहे की, गंतव्यस्थान बदललंय आणि या प्रवासात माझे परप्रांतीय भाऊ सहप्रवासी बनले आहेत’, अशी प्रतिक्रिया त्याने दुसऱ्या नेटकऱ्याला दिली. सोनू सूदचं हे नम्र उत्तर सध्या नेटकऱ्यांचं मन जिंकतंय.

आणखी वाचा : सोनू सूदची एकूण संपत्ती माहितीये का?

मूळ गावी जाण्यासाठी त्वरीत व्यवस्था होत नसल्याने अगतिक झालेल्या परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे महामार्गाने पायीच गावाकडे जात आहेत. काही जण रस्त्याने जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला हात देऊन जर वाहन थांबलेच तर रवाना होत आहेत. अन्यथा पायीच जात आहेत. अशा मजुरांसाठी सोनू सूद बसेसची व्यवस्था करत आहे.