प्रेक्षकांना पाहताना चीड येईल असा खलनायक पडद्यावर साकारणारा अभिनेता सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात लोकांसाठी ‘हिरो’ बनला आहे. स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूद स्वत: रस्त्यावर उतरला असून मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो बसेसची व्यवस्था करत आहे. एका फोन कॉलवर तो स्थलांतरितांची मदत करत आहे. त्यामुळे आता लोकांना तुला पडद्यावर ‘व्हिलन’ म्हणून पाहायची अजिबात इच्छा नाही असं म्हटल्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, “चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मला इंजिनीअर बनायचं होतं. ज्यावेळी इंजिनीअर झालो, तेव्हा वाटलं की आयुष्यात खूप मोठी गोष्ट कमावली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात यायचं होतं. अभिनय क्षेत्रात काम केल्यावर असं वाटलं की खूप मोठी गोष्ट केली. पण आता मी जे काम करतोय, ते केल्यानंतर मला खूप समाधान मिळतंय. कदाचित याचसाठी मी मुंबईला आलो असं वाटतंय. एकाने म्हटलं होतं की, हमारे भाई को हिरो का रोल नही दिया तो भगवान की कसम थिएटर मै आग लगा दूंगा. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात आणि त्यातून नवीन मार्ग मिळत जातात. पण मी सध्या जे काम करतोय, ते माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे क्षण आहेत. बाकीच्या गोष्टी जेव्हा व्हायच्या असतील तेव्हा होतीलच. पण हे काम करताना सर्वाधिक आनंद मिळत आहे. लाखो लोकांच्या चेहऱ्यावर मी हसू आणू शकतोय, यापेक्षा आणखी काय हवंय?”

स्थलांतरित मजुरांना रस्त्यावर चालताना पाहणं आपल्यासाठी खूप कष्टदायी असल्याचं सांगत सोनू सूदने मदतीला सुरुवात केली होती.
विश्वास बसणार नाही पण सोनू सूद इतक्या मोठ्या प्रमाणात मदत करत आहे की, त्याच्या ट्विटर अकाऊंटवर मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेसेज येत असून सोनू सूद त्या प्रत्येक मेसेजला उत्तर देत आहे. त्याला येणाऱ्या प्रत्येक फोनचं उत्तर तो स्वत: देत आहे आणि स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करत आहे.