देशात करानोच्या दुसऱ्या लाटेची भयावह परिस्थिती पहायला मिळतेय. अशा कठिण परस्थितीत अभिनेता सोनू सूद गरीबांचा ‘मसिहॉं’ बनून शक्य तितकी मदत करण्यासाठी धडपड करतोय. करोना काळात त्याची ही धडपड पाहून अनेक नागरिक, तसंच सेलेब्रिटीजनीही सोनू सूद पंतप्रधान व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राखी सावंत पाठोपाठ आता अभिनेत्री हुमा कुरेशीने सुद्धा हीच इच्छा व्यक्त केली होती. यावर आता अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिलीय.

अभिनेता सोनू सूदने नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिलीय. अभिनेत्री हुमा कुरेशीने त्याला पंतप्रधान बनवण्यासाठीची इच्छ व्यक्त केल्याबाबत विचारल्यानंतर सोनू सूदने लाजून ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, “हे थोडं जास्तंच होतंय…ही त्यांचीच कृपा आहे…मी इतका मोठा सन्मान मिळवण्याइतपत त्यांना वाटत असेल तर मी नक्कीच चांगलं काम केलं असणार…पण मी त्यांच्याशी सहमत नाही..आपल्या सर्वांकडे एक सक्षम पंतप्रधान आहेत…इतकी मोठी जबाबदारी उचलण्यासाठी मी अजून खूप लहान आहे…मला माहितेय राजीव गांधी वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनले होते…पण ते एका वेगळ्या परिस्थितीत…याशिवाय ते एका राजकीय कुटुंबातून आहेत…मला असा कोणताच अनुभव नाही.”

अभिनेता सोनू सूद नेहमीच स्वतःला राजकारणापासून दूर ठेवत आला आहे. त्याच्या राजकारण्यात येण्याने सोनू सूदचे अनेक विरोधक चिंतेत येतील. याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, “मी राजकारणात येऊ नये अशी कितीतरी जणांची इच्छ आहे. मला त्यांना त्रास देण्याची इच्छा नाही. मी माझं काम करतोय, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी एक अभिनेता या नात्याने माझं काम एन्जॉय करतोय आणि सामान्य लोकांच्या अडचणीत त्यांचा आधार बनतोय. मला असं वाटतं सत्तेत न येऊन सुद्धा आपण आपलं काम करू शकतो.”

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हुमा कुरेशीने एका माध्यमाशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. बॉलिवूडमधील असा कोणता अभिनेता आहे, जो चांगला राजकारणी होऊ शकेल, असा प्रश्न अभिनेत्री हुमा कुरेशी हिला विचारला होता. हुमाने या प्रश्नाचे उत्तर तत्काळ देत सोनूचे नाव घेतले. हुमा कुरेशी म्हणाली, ‘या प्रश्नाचे अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर सोनू सुद याचेच नाव मी घेईन. सोनूने निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवे. त्याने जर निवडणूक लढवली तर माझे मत त्यालाच असेल. त्याने देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी माझी इच्छा आहे.’

हुमा कुरेशी सध्या तिच्या ‘महारानी’ चित्रपटात केलेल्या भूमिकेसाठी चर्चेत आली आहे. राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटात तिने मुख्यमंत्रीची भूमिका साकारली आहे.