बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या मोठ्या मनाच्या स्वभावाने संपूर्ण देशवासियांचं मन जिंकून घेतलंय. कुणी त्याला देवाची उपमा देतंय, तर कुणी त्याला देशाचा पंतप्रधान रूपात पाहतंय. गेल्या वर्षीपासून न थकता तो लागोपाठ लोकांच्या मदतीसाठी धडपड करता करता ‘गरिबांचा मसिहॉं’ बनला. करोना काळात लोकांसाठी काम करताना त्याला अनेकदा दुःखदायक प्रसंगाला देखील समोरे जावं लागत आहे. याबाबतचे अनेक किस्से सोनूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या सोनूने आता एका अनाथ मुलीच्या मदतीसाठी लोकांसमोर हात जोडले आहेत.

अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर ही मदत मागितली आहे. एका १९ वर्षीय मुलीबाबत लिहिताना सोनू सूदने या पोस्टमध्ये लिहिलं, “मी झोपेतून उठलो आणि मला ही बातमी कळली की त्या मुलीची आईचं सुद्धा निधन झालं…आता ही छोटीशी मुलगी अनाथ झाली…कृपा करून अशा सगळ्या कुटुंबाला सहकार्य करा…त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे…जर तुम्ही मदत नाही करू शकत तर मला सांगा…मी करेल मदत…हे जीवन खूपच निर्दयी आहे.” त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.

एक १९ वर्षीय मुलगी तिच्या संपूर्ण कुटुंबासह करोना पॉझिटिव्ह आली होती. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी तिच्या भावाचं करोनामुळे निधन झालं. त्याचवेळी तिच्या आई-वडिलांची सुद्धा प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी लगेचच वडिलांचा मृत्यू झाला. वेदनादायी गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मुलाचा मृत्यू झालाय हे कळालेलं नसतानाच वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबात लागोपाठ मृत्यू सत्र सुरूच असताना अचानक दुसऱ्याच दिवशी आईनेही या १९ वर्षीय मुलीची साथ सोडली आणि करोनामुळे त्यांचं ही निधन झालं. त्यामुळे आता ही मुलगी अनाथ झाली आहे. हे कळल्यानंतर अभिनेता सोनू सूद दुःखी झालाय. त्यानंतर करोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या अनाथ मुला-मुलींची मदत कऱण्याचा निर्णय सोनूने घेतलाय.

अभिनेता सोनू सूद हा बॉलिवूडमधला पहिला अभिनेता आहे ज्याने अनाथ मुला-मुलींसाठी मदत करण्याची जबाबदारी घेतली. त्याचे हे प्रयत्न पाहून अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुद्धा त्याचं कौतूक केलं होतं. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोनूला ‘Vsionary Philanthropist’ ची उपमा देत संबोधित केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

बिग बींनी दत्तक घेतले दोन अनाथ मुलं
सोनूच्या या आवाहनानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स मदतीसाठी पुढे आले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी यावर लिहिलं, “तरूण मुलं…आपल्या आई-वडिलांच्या अचानक मृत्यूने ही अनाथ झाली आहेत…मी दोन मुलांना दत्तक घेतलं आहे…ते हैदराबाद इथल्या अनाथालयात राहणार आहेत…जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या शिक्षणाचा आणि इतर गरजेचा खर्च मी उचलण्यासाठी तयार आहे.”

अनेक सेलिब्रिटी सुद्धा मदतीसाठी आले पुढे
करोना सारख्या कठिण काळात बॉलिवूडमधले अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अमिताभ बच्चन आणि सोनू सूद यांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा आणि जॅकलीन फर्नांडिस सारखे अनेक कलाकारांनी लोकांच्या मदतीसाठी एक हात पुढे केलाय. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि कित्येक ठिकाणी तर रूग्णसंख्येतील घट पाहता लॉकडाउनचे नियम देखील शिथिल करण्यात आले आहेत.