अभिनेता सोनू सूद लॉकडाउनचा कालावधी सुरु झाल्यापासून गरजुंची मदत करत आहे. आतापर्यंत त्याने असंख्य स्थलांतरीत मजुरांना मदत केल्याचं पाहायला मिळालं. या मजुरांनंतर अन्य समस्याने त्रस्त असलेल्या नागरिकांनाही तो मदत करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याचं मदतकार्य पाहून आता अनेक गरजू नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोनूपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. यात सोनूने एका दिवसाला मदत मागणाऱ्यांची आकडेवारी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

लॉकडाउनचा कालावधी सुरु झाल्यानंतर सोनूने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नागरिकांना त्यांच्या समस्या सांगण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला असून त्यांच्या समस्या ते सांगत आहे. सोनूकडे सध्या ई-मेल,फेसबुक, ट्विटर, लेटर किंवा इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमातून लोक मदतीची मागणी करत आहेत. त्यामुळे सोनूकडे जवळपास दिवसाला हजारोंच्या संख्येने मगदतीची मागणी होत आहे.

“अनेक जण विविध मार्गाने माझ्याकडे मदत मागत आहेत. ११३७ ई-मेल. १९ हजार फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टाग्राम मेसेज, ६७४१ ट्विटर मेसेज, आज एका दिवसात मदतीसाठी इतके मेसेज आले आहेत. दररोज अंदाजे मला इतके मेसेज येत असतात. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणं मला शक्य नाही. मात्र मी पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. दर कोणाचा मेसेज माझ्या नजरेतून सुटला असेल तर क्षमा मागतो”, असं ट्विट सोनूने केलं आहे.


दरम्यान, करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. या काळात असंख्य उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. परिणामी, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या काळात सोनूने अनेकांच्या पोटाची भूक भागवली, असंख्य स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सोय केली. मुंबई पोलिसांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिले. इतकंच नाही तर निसर्ग चक्रिवादळाचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठीदेखील त्याने मदतीचा हात पुढे केला.