अभिनेता सोनू सूद करोना परिस्थितीमध्ये अनेकांना मदत करत आहे. कधी तो मजुरांना त्यांच्या घरी जायला मदत करत आहे, तर कधी रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून देत आहे. पण त्याच्या या कामाबद्दल आता एक गोंधळात टाकणारी माहिती मिळत आहे.

१५ मे रोजी सोनूकडे एका व्यक्तिने ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली. त्याला ओडिशामधल्या बेरहमपूर शहरातल्या गंजम सिटी हॉस्पिटलमध्ये बेड हवा होता. त्याच्या या ट्विटला उत्तर देताना सोनू म्हणाला, काळजी करु नकोस. गंजम सिटी हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली आहे. १७ मे रोजी गंजम जिल्ह्याच्या कलेक्टरने सोनूच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत सांगितलं की आम्हाला सोनू सूदकडून किंवा सूद फाऊंडेशनकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. सोनूच्या ट्विटमध्ये ज्या रुग्णाचा उल्लेख आलेला आहे, तो रुग्ण सध्या गृहविलगीकरणात आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. बेडची कोणतीही समस्या नाही. बेरहमपूर महानगरपालिका लक्ष ठेवून आहे.

गेल्या आठवड्यात हे समोर आलं होतं की, सोनू सूद फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लांट आणत आहे आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तो ते लावत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रासह करोनाचा प्रादुर्बाव जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये तो हे प्लांट्स लावणार आहे.

“ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागल्याचं आपण पाहत आहोत. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन आम्ही लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देत आहोत. हे ऑक्सिजन प्लांट्स रुग्णालयांना तर ऑक्सिजन पुरवतीलच. शिवाय हे प्लांट्स ऑक्सिजन सिलेंडर्सही भरुन देतील. यामुळे करोनाशी लढणाऱ्या लोकांना अधिक मदत मिळेल”, असं सोनू म्हणाला.

या प्लांट्सपैकी पहिला प्लांट फ्रान्समधून इकडे पाठवण्यात आलेला आहे. तो येत्या १० ते १२ दिवसांमध्ये भारतात पोहोचेल अशी माहिती मिळत आहे.
सोनू म्हणतो, “सध्या वेळ हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. पण आम्ही या आव्हानावरही मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून जीव जाणार नाहीत असाच आमचा प्रयत्न असेल.”

सोनू लवकरच ‘किसान’ या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. हा चित्रपट ई.निवास यांनी दिग्दर्शित केलेला आहे. तसंच अभिनेता चिरंजीवी सोबत तो ‘आचार्य’ या तेलूगू चित्रपटातही दिसणार आहे.