सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे अभिनेता सोनू सूद. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी ‘घर भेजो’ मोहीम हाती घेणाऱ्या सोनूवर चहूबाजुंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सोनू आणि त्याच्या टीमने अगदी बस, ट्रेन आणि विमानांच्या मदतीने मजुरांचा प्रवास सुखकर केला आहे. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर सोनू सूद खरा हिरो असल्याचे सांगणारे, #SonuSoodTheRealHero, #SonuSood_A_Real_Hero #SonuSood_भारत_की_शान, #SonuSoodSuperHero याबरोबरच #SonuSood आणि #SonuSoodMissionHome यासारखे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. अनेकजण त्याचे आभार मानण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहे. ट्विटवरुन काहीजण त्याचे आभार मानताना वाळू शिल्प बनवत असल्याचे सांगतात तर काहीजण चित्राच्या माध्यमातून सोनूला धन्यवाद देत आहेत. अशाच एका छानश्या पोस्टरमधून सोनूचे मजुरांनी कौतुक केलं त्यावरही सोनूने सुंदर रिप्लाय दिला असून तो साडेतीन हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे.

फोटो >> सोनूचा थक्क करणारा प्रवास: साडेपाच हजार रुपये घेऊन आला होता मुंबईत, आज ठरतोय अनेकांसाठी ‘देवदूत’

सोनूला ट्विटवरु अनेकजण धन्यवाद म्हणत आहेत. अशीच एक पोस्ट देवेश उपाध्याय नावाच्या सोनूच्या चाहत्याने केली आहे. देवेशने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये काहीजण रास्त्याच्याकडेला एक पोस्टर घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. या पोस्टरवर ‘द रियल हिरो सोनू सूद… मसीहा’ असा मजकूर लिहिलेला आहे. तर हा फोटो शेअर करताना, “देशातील एकमेव मसीहा. सोनू भय्या तुमचा अभिमान वाटतो,” अशी कॅप्शन देत  #मजदूरों का मसीहा हा हॅशटॅग देवेशने फोटो पोस्ट करताना वापरला आहे.

सोनूने या ट्विटची दखल घेत त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “मजूर हे देशाचे खरे मसीहा (देवदूत) आहेत. कोणीही त्यांच्यासाठी देवदूत होऊ शकत नाही,” असं सोनूने म्हटलं आहे. याबरोबर त्याने नसम्कार करणारा इमोन्जीही वापरत मजुरांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे.

सोनूने अनेक मुलाखतींमध्ये मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मजुरांच्या कष्टाचे कौतुक केलं आहे. “हे मजूर आपली शहरं उभी करतात, रस्ते, घरं, कार्यालये बांधतात आणि मग त्यांना असं कसं सोडून द्यायचं. मी बातम्यांना शेकडो मैल चालत जाणाऱ्या मजुरांचे फोटो पाहिले आणि आपण केवळ सोशल नेटवर्किंगवर व्यक्त न होता काम करायला पाहिजे असं वाटलं आणि त्यातूनच हे काम सुरु झालं,” असं सोनू सांगतो.