देशात लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यापासून अभिनेता सोनू सूद अहोरात्र मजुरांना मदत करत आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने त्याने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं आहे. सोनूने स्वखर्चातून बसची सेवा सुरु करुन या मजुरांना त्यांच्या गावी पाठविली. त्यानंतर आता तो ट्रेनच्या माध्यमातून मजुरांना गावी पाठवत आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या या नव्या कामाला वेग आला आहे.

‘इंडियन एक्स्प्रसे’नुसार, उत्तर प्रदेश, बिहार येथील जवळपास १ हजार मजुरांना ट्रेनच्या माध्यमातून सोनूने त्यांना गावी पाठवलं आहे. विशेष म्हणजे या मजुरांना सोडण्यासाठी सोनू स्वत: मध्यरात्री २ वाजता ठाणे स्थानकात पोहोचला होता.

“आज ठाणे स्थानकातून उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या. आम्ही या प्रवाशांना सॅनिटायझर, खाद्यपदार्थाची पाकिटं अशा गरजेच्या वस्तूंचं वाटप केलं आहे. या संकटकाळी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेली मदत आणि प्रत्येक कार्यात करत असलेल्या पाठिंब्यामुळे आम्ही मनापासून आभार मानतो. मला जितकं शक्य होईल तितकी मदत मी गरजू मजुरांना कायम करेन. तसंच शेवटचा प्रवासी घरी पोहचेपर्यंत मी नक्कीच मदत करेन,” असं सोनूने सांगितलं.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या सोनूच्या या मदतकार्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यास सांगत आहे. तसंच त्याने मजुरांमध्ये सॅनिटायझर, खाद्यपदार्थांचे पाकिट अशा गरजेच्या वस्तू दिल्या आहेत. विशेष म्हणजे सोनूने काही दिवसांपूर्वी ट्विटवर एक क्रमांक शेअर केला होता. ज्या मजुरांना त्यांच्या घरी परत जायचं आहे, अशा व्यक्तींना संपर्क साधा असं आवाहन त्याने केलं होतं.