बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा या करोनाच्या संकटात अनेकांसाठी देवदूत बनला आहे. गरजवंतांच्या मदतीला उभा राहणारा सोनू सूद चाहत्यांच्या मदतीसाठी गेल्या वर्षभरापासून धडपडतोय. प्रत्येक गरजूची मदत करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. मात्र सोनूच्या अथक प्रतयत्नांनतरही त्याला एका मुलीचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. यामुळे सोनूला प्रचंड दु:ख झालं आहे.

एका महिन्यापूर्वी सोनू सूदने नागपूरमधील एका 25 वर्षीय मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर काल रात्री भारतीने अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळताच सोनूने दु:ख व्यक्त केलंय. ट्विट करत तो म्हणाला, ” नागपूरची तरूण मुलगी भारती जिला मी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेलं होतं तिने काल रात्री हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. ECMO मशीनच्या मदतीने ती महिनाभर जिवंत होती. तिच्या कुटुंबातील आणि इतर सर्व ज्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांसाठी मला वाईट वाटतंय. मी तिला वाचवू शकलो असतो तर. आयुष्य हे खूप अस्थिर आहे.” अशा आशयाचं ट्विट करत सोनूने भावना व्यक्त केल्या आहेत.

या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सोनू सतत डॉक्टरांच्या संपर्कात होता. डॉक्टरांनी भारतीची जगण्याची शक्तता अगदी कमी असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही सोनूने तिला अधिक उत्तम उपचारासाठी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही भारतीने जीवनाच्या या लढाईत हार पत्करली.

वाचा: अंकिता लोखंडेने घेतला करोना लसीचा पहिला डोस; लस घेतांना केला स्वामींचा धावा

करोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. वाढत्या करोना रुग्णांमुळे ऑक्सिजन, बेडस्, औषधांचा तुडवडा निर्माण झालाय. मात्र अशातही अभिनेता सोनू सूद गरजवंतांच्या मदतीला धावून जातोय. काही दिवसांपूर्वीच सोनूने तो 24 तासातील 22 तास फोनवर असतो असं सांगितलं होतं..