जगभरात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. २०२० हे वर्ष संपल्यानंतर करोना नष्ट होईल असं वाटलं होतं, पण मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. देशभरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. पंजाबमध्येही सध्या करोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पंजाब सरकारने अभिनेता सोनू सूदवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

पंजाब प्रशासनाने अभिनेता सोनू सूदला करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल सोनू सूदची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी सोनूला आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले, “लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित कऱण्यासाठी सोनूसारखा दुसरा रोल मॉडेल असू शकत नाही. पंजाबच्या लोकांमध्ये लस घेण्यासंदर्भात भीती आणि शंका असल्याचं दिसून येत आहे.”

ते पुढे म्हणाले, “त्यांनी गेल्या वर्षी अनेक लोकांची मदत केली आणि त्यामुळे जगभरात त्यांचं नाव झालं, त्यामुळे लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. या ‘पंजाब दा पुत्तर’ने लोकांना लसीकरणाचं महत्त्व समजावल्यास लोक त्यांचं नक्की ऐकतील.”

सोनू सूदही या नव्या जबाबदारीसाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. तो म्हणाला, “मी या मोहिमेसंदर्भातली कोणतीही भूमिका मनापासून बजावेन आणि माझ्या राज्यातल्या लोकांचा जीव वाचवण्याचं काम करण्यात धन्यता मानेन.”

या भेटीदरम्यान सोनूने त्यांना आपलं ‘आय एम ने मसीहा’ हे आत्मचरित्रही भेट दिलं. हे पुस्तक सोनूचा प्रवास आणि त्यादरम्यान येणारे अनुभव सांगणारं आहे.