लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली. त्यासाठी त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने ट्विटरद्वारे अनेक मजुरांशी संवाद साधला होता. पण आता अचानक या मजुरांनी त्यांचे ट्विट डिलिट केल्याचे म्हटले जात आहे.

अनेक मजुरांनी सोनू सूदकडे ट्विटरद्वारे मदत मागितली होती. सोनू सूदने त्यांना ट्विटरवर रिप्लाय देत त्यांची मदत केली होती. तसेच सोनूने दिलेल्या रिप्लायमुळे तो सोशल मीडियावर चर्चेतही होता. पण आता पत्रकार दिलीप मंडल यांनी सोनू सूदने ज्या लोकांना रिप्लाय केला त्या लोकांनी त्यांचे ट्विट डिलिट केल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. त्यामुळे हे ट्विट करणारे लोक होते की फक्त आयडी होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘सोनू सूदने ट्विटरवर ज्या आयडीवर उत्तर देत मदत केली आणि घरी पोहोचल्यावर ज्या आयडीने सोनू सूदचे आभार मानले होते, त्यातील अनेक आयडींनी आपली पोस्ट डिलिट केली आहे. हे ट्विट करणारे लोकं होते की फक्त आयडी होते?’ असे दिलीप मंडल यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर डिलिट झालेल्या ट्विटचा स्क्रिन शॉर्ट देखील त्यांनी शेअर केला आहे.

यामधील अनेक ट्विटमध्ये लोकांनी त्यांचे फोटो ट्विट केल्याचे म्हटले जात आहे. पण ज्या लोकांनी ट्विटरद्वारे सोनूकडे मदत मागितली. त्या लोकांना त्याने मदतही केली. पण आता अचानक डिलिट होत असेलेले हे तेच ट्विट होत आहेत की दुसरे कोणते हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत.

आता सोनू सूदने देखील यावर ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. त्याने ट्विटमध्ये कृपया ज्यांना मदतीची खरोखर गरज आहे त्यांनीच ट्विट करावे. मी पाहिले अनेक लोक ट्विट करुन त्यांचे ट्विट डिलिट करत आहेत. अशाने ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचणे कठीण होईल असे म्हटले आहे.