‘ब्लू प्लानेट II: वन ओशन अँड द डीप’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सोनी बीबीसी अर्थने हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये समुद्र विश्व अगदी नयनरम्य पद्धतीने दाखवण्यात आले आहे. १ मिनिटाचा हा ट्रेलर पाहताना एकदाही नजर या ट्रेलरवरुन हटत नाही. महासागरात राहणाऱ्या महाकाय जीवांपासून ते जीव- जंतूपर्यंत आजवर न पाहिलेल्या गोष्टींचे चित्रण करण्यात आले आहे.

न्युझीलँडमधील जीवघेण्या व्हेलचे डॉल्फिनसोबतचे संबंध असो किंवा पाण्याबाहेर उंच उडी घेणाऱ्या माश्यांचे वेगवेगळे कारनामे यामध्ये पाहता येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २२ शहरांमध्ये फक्त पीव्हीआरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

समुद्राच्या तळाशी आठ किलोमीटर आत जाऊन सहा हजार तासांहून अधिकचे चित्रण यात करण्यात आले आहे. या सिनेमात सर डेविड एटनबरो यांचा आवाज आणि प्रसिद्ध संगीतकार हँस जिमर यांचे संगीत आहे. ही अँडवेंचरल ट्रीट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरेल, यात काही शंका नाही.