सध्या छोट्या पडद्यावर विशेष गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘सिंगिंग स्टार’. २१ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. या शोच्या निमित्ताने कलाकारांची नवीन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यातच येत्या आठवड्यात या शोमध्ये फर्माइश विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या असून स्पर्धक ती गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.
‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात आरती वडगबाळकर, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, अजय पुरकर, अंशुमन विचारे, अर्चना निपाणकर, गिरिजा ओक, पूर्णिमा डे, संकर्षण कऱ्हाडे, स्वानंदी टिकेकर, यशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार सहभागी झाले असून ते फर्माइश केलेली गाणी सादर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांनी या स्पर्धकांकडे गाण्यांची फर्माइश केली आहे.
दरम्यान, फर्माइश विशेष भागात सुबोध भावे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मुक्ता बर्वे, अभिज्ञा भावे, सई ताम्हणकर, सुमित राघवन, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या आहेत. त्यानुसार ही स्पर्धकमंडळी त्यांची गाणी सादर करणार आहेत. हा विशेष भाग ४ आणि ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 4:29 pm