करायला गेलं एक आणि झालं भलतंच असाच काहीसा प्रकार सोनी पिक्चरसोबत घडला. या कंपनीला युट्युबवर आगामी चित्रपटाचा ट्रेलर अपलोड करायचा होता. मात्र एका चुकीमुळे चित्रपटाच्या ट्रेलरऐवजी चुकून संपूर्ण चित्रपटच अपलोड झाला. ९० मिनिटांचा चित्रपट या चॅनेलच्या युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलाय. अपलोड होऊन आठ तास उलटले होते तरीही एकालाही चित्रपट अपलोड झाल्याची कल्पना आली नाही.

मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या देणाऱ्या सीबीआर डॉट कॉमनं पहिल्यांदा ही चूक निदर्शनास आणून दिली. ३ जुलै रोजी या कंपनीच्या अधिकृत युट्यूब अकाऊंवर ‘खली द किलर’चा ट्रेलर प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. मात्र एका चुकीमुळे ट्रेलरऐवजी संपूर्ण चित्रपट अपलोड झाला. जॉन मॅथ्यू यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. या कालावधीत अनेकांनी मोफत हा चित्रपट डाऊनलोडही केला. अखेर काहींनी कंपनीला ट्रेलरऐवजी चित्रपट अपलोड झाल्याचं लक्षात आणून दिलं आणि आठ तासांनंतर अखेर कंपनीनं हा चित्रपट युट्युबवरून हटवला आहे.