कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी काही केल्याने कमी होताना दिसत नाहीयेत. ‘द कपिल शर्मा शो’ संदर्भात एकामागोमाग एक नवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. ‘बादशाहो’ चित्रपटाची टीम कपिलच्या सेटवरुन शूट न करताच परतल्याचं कळत असतानाच आता सोनी वाहिनीने कपिलला इशारा दिल्याचं म्हटलं जातंय. ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सेटवरुन सेलिब्रिटींना परतावं लागल्याने सोनी वाहिनीने कपिलला बजावले आहे.

याआधी कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख- अनुष्का, अक्षय- भूमी, अर्जुन कपूर- अनिल कपूर या सेलिब्रिटींना एपिसोड शूट न करताच परतावे लागले. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली. ‘बादशाहो’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी अजय देवगण, इशा गुप्ता आणि इलियाना डिक्रूझ कपिलच्या सेटवर पोहोचले होते. मात्र कपिल बराच वेळ सेटवर नव्हता. कपिलच्या टीमकडूनही त्यांना योग्य उत्तर दिलं जात नव्हतं. त्यानंतर कपिल झोपल्यामुळे शूटसाठी दोन तास थांबावे लागणार असं त्यांना सांगण्यात आलं. पुढचे कार्यक्रम ठरलेले असल्याने अजय आणि त्याची टीम तेथून निघणंच पसंत केलं. प्रमोशनसाठी पुढील वेळापत्रक ठरलेले असल्याने आता पुन्हा अजय कपिलच्या शोमध्ये येणार नाही असं म्हटलं जातंय.

वाचा : पुरस्कार सोहळ्यांविषयी कंगना म्हणते…

‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटच्या माहितीनुसार कपिलच्या या ‘अनप्रोफेशनल’ वागणुकीमुळे सोनी वाहिनीचे अधिकारी त्रस्त झाले आहेत. वाहिनीकडून त्याला इशाराही देण्यात आलाय. अधिकाऱ्यांच्या एका बैठकीनंतर कपिल शर्माला इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकेकाळी टीआरपी यादीत ‘द कपिल शर्मा शो’ अग्रस्थानी असायचा. आता ती जागा ‘खतरों के खिलाडी’, ‘डान्स प्लस ३’, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोजने घेतली आहे. त्यामुळे सोनी वाहिनीसाठी हे चिंतेचं कारण ठरलंय. अशातच जर सेलिब्रिटी सेटवरुन परतत असल्याच्या घटना वारंवार होत असतील तर शो आणि वाहिनीच्या टीआरपीमध्ये घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळेच कपिलला हा इशारा देण्यात आला आहे.