साखर, धनादेश चोरीची प्रकरणे घडली नसतानाही चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि विरोधकांनी ती रंगवली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे काढून मला आणि चित्रपट महामंडळाला बदनाम करण्याचा कट विरोधकांनी रचला आहे, असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी येथे केला.

या विरोधात बैठक घेऊन महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि त्यांना साथ दिलेल्या विरोधकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संजय ठुबे, रवि गावडे, शरद चव्हाण, अर्जुन नलावडे,  सुरेंद्र पन्हाळकर आदी उपस्थित होते.  चित्रपट महामंडळाच्या गरजू सभासदांना करोना काळात देण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये अध्यक्ष आणि संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना राजेभोसले म्हणाले, की आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याची मोहीम उघडली आहे. माजी अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष यमकर, बाळा जाधव यांनी साखर चोरल्याचे आरोप केले आहेत. सभासदांना साहित्य वाटप करतेवेळी यमकरांचा सहभाग नव्हता. मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात धिंगाणा घालणे, शिपायांना दमदाटी करून साहित्य ताब्यात घेणे, महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी गैरप्रकार उपाध्यक्ष यमकर यांनी केले आहेत. याची गंभीर दखल घेऊन संचालक मंडळाची लगेचच बैठक घेऊन उपाध्यक्ष आणि विरोधकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.