‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘माणसं’ द्वितीय

आजूबाजूच्या घटनांवर व्यक्त होण्याची तळमळ, त्याला धिटाई, सक्षम संहिता, कल्पक मांडणी आणि कसदार अभिनयाची जोड असे समीकरण ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने शनिवारी जुळून आले. एकाहून एक सरस एकांकिकांनी स्पर्धेची चुरस वाढवली. आपापल्या विभागातून अव्वल ठरलेल्या एकांकिकांना टक्कर देत पुणे येथील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची ‘सॉरी परांजपे’ ही एकांकिका ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरली. दिग्दर्शन, लेखन, अभिनय अशा वैयक्तिक परितोषिकांसह बीएमसीसी महाविद्यालयाने या स्पर्धेत बाजी मारली.

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

महाराष्ट्रातील एकांकिकांची परंपरा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या चौथ्या पर्वाची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात जल्लोषात झाली. नाटय़-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, नाटय़रसिक आणि अर्थातच महाविद्यालयीन विद्यार्थी अशा तारकांकित गर्दीत पार पडलेल्या या महाअंतिम फेरीमध्ये ठाणे, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई आणि पुणे अशा आठ विभागांत अव्वल ठरलेल्या एकांकिकांचा समावेश होता.

या स्पर्धेचे एक वैशिष्टय़ म्हणजे आपापल्या नाटय़ाविष्कारातून विद्यार्थी कलाकारांनी सामाजिक विषय मोठय़ा खुबीने मांडले. त्यांच्या सादरीकरणातील प्रयोगशीलतेला प्रेक्षकांचीही उत्स्फूर्त दाद मिळत होती.

उत्तरोत्तर वाढत गेलेल्या चढाओढीने  निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचवली. महाराष्ट्राची लोकांकिका म्हणून ‘सॉरी परांजपे’चे नाव जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट, ‘आवाज कुणाचा.?’, ‘हिप हिप हुर्रे’ अशा घोषणांनी अवघे प्रेक्षागृह दणाणून गेले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते राजन ताम्हाणे हे या फेरीसाठी परीक्षक होते. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी, ‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील, ‘पितांबरी’च्या गीता माणेरीकर, ‘मुंबई फिवर १०४ रेडिओनशा’चे वैभव पावसकर उपस्थित होते.

’ सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – सॉरी परांजपे – बीएमसीसी, पुणे

’ सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – माणसं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, नृत्यविभाग, औरंगाबाद

’ सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – डिफेन्स रेस्टस् – भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअिरग, कोल्हापूर

’ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ऋषी मनोहर – (सॉरी परांजपे)

’ सर्वोत्कृष्ट लेखक – चिन्मय देव -(सॉरी परांजपे)

’ सर्वोत्कृष्ट अभिनय – माणसं या एकांकिकेकतील कलाकार

’ सर्वोत्कृष्ट अभिनय -ऋषी मनोहर -(सॉरी परांजपे)

’ सर्वोत्कृष्ट अभिनय – रोहित मोहिते – (शुभयात्रा)

’ सर्वोत्कृष्ट नेपथ्य – (डिफेन्स रेस्टस्)

’ सर्वोत्कृष्ट संगीत – अनिल बडे – (माणसं)

’ सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- शाम चव्हाण – (शुभयात्रा)

’ अभिनय उत्तेजनार्थ – अपूर्व इंगळे (१६५०)

’ अभिनय उत्तेजनार्थ – श्रीपाद पाटील (डिफेन्स रेस्टस्)

************

परीक्षक

‘लोकसत्ता लोकांकिके’च्या माध्यमातून महाराष्ट्रात एकंदर सध्या काय चालू आहे, हे पाहायला मिळालं. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असल्यामुळे त्याचाही एक सकारात्मक बदल झालेला जाणवला. विद्यार्थी लोकांकिकेसाठी म्हणून खास एकांकिकेची निर्मिती तयार करत असल्याचे जाणवले. पुण्या-मुंबईच्या स्पर्धकांच्या जोडीला उभे राहतील असे प्रयोग, तयारी बाहेरच्या स्पर्धकांची दिसली. त्यामुले कुठेही प्रादेशिक असमतोल आढळला नाही.

– चंद्रकांत कुलकर्णी

************

सध्याच्या घडीला व्यक्त होण्याची इतकी माध्यमे उपलब्ध असताना विविध स्तरातील तरुण वर्ग नाटकाकडे वळत आहे, हेच जास्त कौतुकास्पद वाटते. नाटक जगण्याशी समांतर असते, या दृष्टीकोनातून तरुणाई या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उस्तुक आहे. शहराच्या तुलनेत खेडय़ापाडय़ातील मुलांना या क्षेत्राच्या अभ्यासाचे व्यासपीठ उपलब्ध नाही आणि तरीहे हे विद्यार्थी धडपडत इथपर्यंत पोहचत आहेत, हे फारच आश्वासक चित्र आहे.

– ज्योती सुभाष

************

राज्यातील विविध प्रदेशामधील विद्यार्थ्यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, या क्षेत्राबाबतचे गांभीर्य एक परीक्षक म्हणून आम्हाला ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या व्यासपीठावरुन पाहता आले. शहरा बाहेरून येणाऱ्या दिग्दर्शकांनी आपल्या मातीतले विषय करावेत. परंतु कुठल्या दिशेला एकांकिका स्पर्धा होते, त्यातील विषयासह मांडणी, नेपथ्य, प्रकाशयोजना आदी बाबींकडेही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षांत ते ही शहरातल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड त्यांची तयारी नक्कीच दिसेल

– राजन ताम्हणे

************

गेल्या काही वर्षांपासून संवादांपेक्षा ध्वनी आणि सादरीकरणावर अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जातो. लोकांकिकेतही ध्वनी आणि दृश्य परिणामांवर भर दिलेला दिसतो. सध्या एकूणच नाटकांना कमी प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा आणि टीव्हीत चíचल्या जाणाऱ्या विषयांपेक्षा वेगळे विषय नाटकाद्वारे मांडावेत.

– विजय केंकरे, प्रसिद्ध अभिनेते

************

विजेते

दिग्दर्शक म्हणून जे प्रेक्षकांपर्यत पोहचवायचे होते ते साध्य झाले याचा आनंद आहे. यापेक्षा सांघिक यश मिळाल्याचा आनंद सर्वाधिक आहे.

– ऋषी मनोहर (सॉरी परांजपे) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनय

************

प्रेक्षकांचा भरभरुन मिळालेला प्रतिसादामुळे खूपच छान वाटले. यामुळे आम्हाला पुढच्या कामासाठी नक्की प्रेरणा मिळेल.

– चिन्मय देव (सॉरी परांजपे) सर्वोत्कृष्ट लेखक

************

पारितोषिक मिळाल्यानंतर उत्कृष्ट अभिनयासाठी अजून मेहनत घेण्याची जबाबदारी वाढली आहे. गेल्यावर्षी दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्यानंतर यावेळेस अभिनयाचा अनुभव फार शिकवणारा आहे.

– रोहित मोहिते (शुभयात्रा, मुंबई) सर्वोत्कृष्ट अभिनय

************

गेल्यावर्षी हुकलेले पारितोषिक यंदा मी जिद्दीने मिळविले. प्राथमिक फेरीतही मला प्रकाशयोजनेचे पारितोषिक मिळाले होते. मात्र महाअंतिम फेरीतील पारितोषिक खास आहे.

– श्याम चव्हाण (शुभयात्रा) प्रकाशयोजना

************

मुंबईत मी पहिल्यांदाच सादरीकरण केले आहे. हा अनुभव वेगळाच होता. खूप प्रोत्साहन मिळाले. नेपथ्याचे श्रेय संघाचे आहे. शून्य खर्चात आम्ही संपूर्ण नेपथ्य केले. आमच्या संपूर्ण संघाने अंभियांत्रिकीच्या कार्यशाळेत सर्व साहित्य तयार केले आहे.

– श्रीपाद पाटील (डिफेन्स रेस्ट्स) नेपथ्य आणि उत्तेजनार्थ अभिनय

************

महाअंतिम फेरीची आतुरता होती. शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता होती. एकांकिकेच्या माध्यमातुन चांगले व्यासपीठ मिळाले . हे दुसरेच नाटक आहे ज्यामध्ये अभिनय करत आहे. यावर्षी प्रथमच लोकसत्ता लोकांकिकेत सहभागी झालो.

– अपूर्व इंगळे, अभिनय उत्तेजनार्थ

************

एकांकिका नाटय़सृष्टीचा पाया आहे. महाविद्यालयीन पातळीवर एकांकिका ही प्रयोगशाळा आहे. तेव्हा उद्याचे कलाकार घडवण्यासाठी समाजाने या एकांकिकांना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

–  जयराज साळगावकर, लेखक

************

सादर झालेल्या एकांकिकेतील निर्मिती, प्रकाशयोजना, संकल्पना, अभिनय, दिग्दर्शन यांतून आम्हाला खरंतर खूप काही शिकण्यासारखं आहे. व्यावसायिक रंगभूमीवर आम्हाला अनेक गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता येत नाहीत. त्या गोष्टी या मुलांनी करून दाखविल्या आहेत. नाटकांची संहिता म्हणजे बांधणी उत्तम होणे गरजेचे आहे. ही बांधणी मात्र या एकांकिकांमध्ये साधली नसल्याचे जाणवले.

– अनंत पणशीकर, निर्माते

************

‘लोकसत्ता लोकांकिका’मधील कलाकारांची ऊर्जा, सादरीकरण अगदी थक्क करणारे आहे. उद्याची रंगभूमी ही तरुणाई नक्कीच पुढे नेतील, असा विश्वास या एकांकिका पाहून येतो.

 – अरुण काकडे, अविष्कार संस्थेचे प्रमुख

************
‘लोकसत्ता’च्या ‘लोकांकिके’च्या माध्यमातून राज्यभरातील त्या त्या ठिकाणचे प्रश्न, तरुणाई त्यावर कशा रीतीने प्रतिसाद करते किंवा विचार करते याची झलक पाहायला मिळाली. या मुलांच्या उत्साहाला अविरत मेहनत, शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोन मिळणे गरजेचे आहे.

– अजित भुरे, अभिनेते