मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं आहे. पालिकेच्या या कारवाईवर दाक्षिणात्य अभिनेता विशाल याने नाराजी व्यक्त केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने कंगनाची तुलना थेट क्रांतिकारक भगत सिंग यांच्याशी करत तिला पाठिंबा दिला आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

“प्रिय कंगना, तुमच्या धैर्याला सलाम. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही या वादात उडी मारली. हे तुमचं वैयक्तीक प्रकरण नाही. तरी देखील सरकारच्या प्रकोपाचा सामना तुम्हाला करावा लागत आहे. पण तुम्ही तितक्याच सक्षमपणे उभ्या आहात. हे खूप मोठं उदाहरण आहे. १९२० साली भगत सिंग यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती.” अशा आशयाचं ट्विट करुन विशालने कंगनाची तोंड भरुन स्तुती केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं देखील ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. दरम्यान कंगना आता मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.