News Flash

अजय देवगणसोबत झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री

सय्यद अब्दुल रहिम यांच्या बायोपिकमध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे

अजय देवगणसोबत झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री

बॉलिवूडमधील चित्रपटांचा ट्रेण्ड काळानुरुप बदलत चालला आहे. त्यानुसार सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. या बायोपिकमध्ये कलाविश्वातील, तसंच क्रीडा विश्वातील व्यक्तींचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला क्रीडा विषयावरील बायोपिकला प्रेक्षकांकडून अधिक पसंती मिळत आहे. क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांवरील चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजले आहेत. त्यामुळे लवकरच फुटबॉल या खेळावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

दिग्दर्शक अमित शर्मा फुटबॉलपटू सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाची निर्मिती करत आहेत.१९५०- १९६३ या कालावधीत सय्यद अब्दुल रहिम भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुग मानला जातो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी अब्दुल रहिम यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यामुळे त्यांचा हा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी अमित शर्मा सज्ज झाले आहेत.

अजय देवगण या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश स्क्रीन शेअर करणार आहे. किर्ती आतापर्यंत तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्यानंतर आगामी बायोपिकमध्ये किर्तीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

फुटबॉलपटू सय्यद अब्दुल रहिम यांचा, त्यांच्या कारकिर्दीचा जगाला विसर पडला आहे. त्यामुळे त्यांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याची गरज आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे क्रीडाविश्वातील योगदान रुपेरी पडद्यावर सादर होणार आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे, असं किर्तीने सांगितलं.

पुढे ती असंही म्हणते, ज्या चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका आहेत, असे चित्रपट मला करायला जास्त आवडतात. त्यामुळे सध्या मी अशाच चित्रपटांची निवड करत आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनगुप्ता करणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 3:25 pm

Web Title: south actress keerthy suresh ajay devgn sports biopic film
Next Stories
1 Rohit Shetty Birthday Special : रोहित शेट्टीचे बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्स
2 माझ्या माथ्यावरील ‘तो’ कलंक आता पुसला गेला – संजय दत्त
3 ‘या’ अभिनेत्यासोबत आलिया साजरा करणार वाढदिवस
Just Now!
X