जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स २०१७’चा मुकूट दक्षिण आफ्रिकेच्या डेमी लेई नेल्स-पीटर्सने पटकावला. २६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार २७ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ‘मिस युनिव्हर्स २०१७’ची स्पर्धा रंगली.

वाचा : ‘पद्मावती’च्या समर्थनार्थ कलाकार संघटनांचा एल्गार

यंदाची मिस युनिव्हर्स डेमी लेई नेल्स-पीटर्सनला मानाचा मुकुट घालण्याचा मान मागील वर्षीची विजेती सौंदर्यवती आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिला मिळाला. दक्षिण आफ्रिकेसाठी हा किताब पटकावणारी डेमी लेई ही दुसरी सौंदर्यवती आहे. याआधी मार्गारेट गार्डिनर हिने १९७८मध्ये हा किताब जिंकला होता. डेमी लेईमुळे दक्षिण आफ्रिकेची तब्बल ३९ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. ‘मिस युनिव्हर्स २०१७’मध्ये कोलंबियाच्या लॉरा गोंझालेझने दुसरे तर जमैकाच्या डेव्हिना बेनेटने तिसरे स्थान मिळवले.

VIDEO वाचा : अखेर रणवीर म्हणाला, ‘दीपिका तुझ्या येण्याने…’

‘मिस युनिव्हर्स २०१७’मध्ये सौंदर्यवती श्रद्धा शशीधरने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, या स्पर्धेत भारताला हा किताब मिळवून देण्यासाठी ती अपयशी ठरली. मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकल्यानंतर श्रद्धाकडून सर्वांच्या अपेक्षा होत्या. श्रद्धा ‘यामाहा फॅसिनो मिस दीवा २०१७’ची विजेती आहे.