साउथ सुपरस्टार ध्रुव सरजाच्या सिनेमासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ध्रुवच्या अ‍ॅक्शन सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. मात्र यावेळी ध्रुवचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पोगारु’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसचं सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे सिनेमातून १४ आक्षेपार्ह सीन काढून टाकण्यात आले आहेत.

पोगारु सिनेमातील एका दृश्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या सिनेमातील एका दृश्यात काही गुंड हवन करणाऱ्या ब्राह्मणासोबत गैरवर्तन करताना दिसतात. त्याच्या खांद्यावर पाय ठेवतात असं दाखवण्यात आलं आहे. या सीनमुळे ब्राह्मण समाजात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. अनेक ठिकाणी सिनेमाचं स्क्रीनिंग थांबवण्याची मागणी होतेय. या वादानंतर सिनेमाच्या मेकर्सने कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि ब्राह्मण विकास बोर्डाशी चर्चा केली. या चर्चेनंतर सिनेमातील 14 आक्षेपार्ह सीन कट करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला.

19 फेब्रुवारीला ‘पोगारु’ सिनेमा रिलीज झालाय. मात्र रिलीजनंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. सोशल मीडियावरुनदेखील रोष व्यक्त करण्यात आला. भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनीदेखील ट्वीट करत संताप व्यक्त केला. “हिंदूंचा अपमान करणं आता फॅशन झालीय. कोणामध्ये इतर धर्माच्या विषयी असं दाखवण्याची हिंमत आहे का? या सिनेमाचं स्क्रीनिंग थांबवलं पाहिजे” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलीय.यासोबतच अनेक नेटकऱ्यांनी सिनेमाच्या टीमला ट्रोल केलंय.

या सिनेमाचं दिग्दर्शन नंद किशोर यांनी केलंय. तर सिनेमात रश्मिका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. येत्या काळात रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.