गुरुवारी अभिनेता कमल हसन यांनी चाहत्यांचे ३० कोटी रुपये परत करण्याचा निर्णय घेतला. राजकीय पक्ष उभारणीसाठी चाहत्यांनी ३० कोटी रुपयांची देणगी गोळा केली होती. पण, पक्ष स्थापन केल्याशिवाय अशा प्रकारची देणगी स्वीकारणे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी सर्व पैसे परतवण्याचा निर्णय घेतला. एका तमिळ मासिकातून त्यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.

‘मी प्रत्येक चाहत्याला त्यांनी देणगी स्वरुपात दिलेले पैसे परत करत आहे. याचा असा अर्थ होत नाही की मी त्या देणगीचा (भविष्यात) स्वीकार करणार नाही’, असे ते म्हणाले. त्यासोबतच आपण राजकारणाविषयी घेतलेल्या निर्णयामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मला पैशांची आवश्यकता भासेपर्यंत चाहत्यांनी ते पैसे स्वत:कडेच सुरक्षित ठेवावेत असे आवाहनदेखील त्यांनी केले. मला गरज भासेपर्यंत हे पैसे तुमच्याकडेच जपून ठेवा, जर तुम्ही ते पैसे खर्च केलात तर मात्र ते माझेच दुर्दैव असेल’, असेही ते म्हणाले. भविष्यात आपण राजकारणात प्रवेश करणार असून, पक्ष बळकट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. बऱ्याच राजकीय पक्षांना या क्षेत्रात अपयश येते, कारण त्याचे नेते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात असफल ठरतात. पण, आपल्या बबातीत असे होणार नाही याबाबत हसन आशावादी आहेत.

वाचा : लहान मुलाच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे कमल हसन अस्वस्थ

सहसा कलाकार मंडळी त्यांच्या कलेमुळे किंवा आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतात पण, कमल हसन यांच्या बाबतीत तसे नाहीये. सोशल मीडियावर विविध विषयांना अनुसरुन आपल्या भूमिका ठामपणे मांडणाऱ्या या अभिनेत्याच्या राजकीय कारकिर्दीला कधी सुरुवात होणार याचीच अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या सुरु असणाऱ्या राजकिय घडामोडी आणि हसन यांच्या समर्थकांचा उत्साह पाहता येत्या काळात ते एका नव्या इनिंगला सुरुवात करतील असे म्हणायला हरकत नाही.