कोणताही कलाकार जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचतो. परंतु तिथे पोहोचण्याचा प्रवास जितका कठीण असतो त्याहून कठीण तिथे टिकून राहण्याचा प्रयास असतो. अनेक यशस्वी कलाकारांना हे जमत नाही आणि पाहता पाहता त्यांच्या यशाचा डोलारा ढासळू लागतो. अशा कलाकारांच्या यादीत आता ‘चोई श्युंयांग यून’ हे आणखी एक नाव जोडले गेले आहे. ‘टॉप’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चोईने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी २००७ साली ‘आय अ‍ॅम सॅम’ या गाण्यातून आपली कारकीर्द सुरू केली. अल्पावधीत या दक्षिण कोरिअन संगीतकाराने अमाप लोकप्रियता मिळवली. त्याची ‘फँटास्टिक बेबी’, ‘बँग बँग बँग’, ‘डे बाय डे’, ‘लास्ट डान्स’ ही गाणी कोरिअन संगीत चाहत्यांच्या ओठांवर खेळू लागली. पण मिळवलेले यश टिकवणे ही एक कला आहे आणि चोईला नेमके तेच साधले नाही. यशाची धुंदी, अति आत्मविश्वास, बेपर्वाई त्याच्या आचरणात झळकू लागली. परिणामी त्याची लोकप्रियता आणि निर्मात्यांकडून येणारा प्रतिसाद कमी होऊ लागला. त्याचा थेट परिणाम त्याच्या मानसिक स्थर्यावर होऊ लागला आणि हळूहळू तो अमली पदार्थाच्या आहारी गेला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती वेगाने ढासळत आहे. दक्षिण कोरिया या देशात अमली पदार्थाचे सेवन करणे हा कायद्याने गुन्हा असून गुन्हेगाराला कठोर शासन केले जाते. पोलिसांच्या मते त्याची प्रकृती समाधानकारक होताच त्याला अटक करून त्याच्यावर खटला चालवण्यात येईल. अहंकारामुळे अनेक उमलत्या कलाकारांची कारकीर्द बहराला येण्याआधीच कोमेजते. चोईचेही आपली कारकीर्द वाचवण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत.