12 November 2019

News Flash

‘फक्त हिंदी कलाकारांनाच निमंत्रण का?’; चिरंजीवीच्या सूनेचा मोदींना सवाल

नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी शाहरुख खान, आमिर खान, कंगना रणौत यांसोबत अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (१९ ऑक्टोबर) दिल्लीत शाहरुख खान, आमिर खान आणि कंगना रणौतसह चित्रपट व कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांच्यासोबत गांधी विचारांवर चर्चा केली. चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार आणि त्यांच्या जीवन मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं आवाहन मोदींनी या सर्व कलाकारांना भेटीदरम्यान केलं. पण या भेटीवर दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांच्या सूनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. उपासनाने ट्विटरवर मोदींना एक पत्र लिहित फक्त हिंदी कलाकारांनाच निमंत्रण का असा सवाल विचारला आहे.

”प्रिय नरेंद्र मोदीजी.. भारताच्या दक्षिण भागात राहणारे आम्ही तुमचं फार कौतुक करतो आणि पंतप्रधान म्हणून तुमच्यासारखी व्यक्ती लाभल्याचा आम्हाला अभिमान आहे. दिग्गज व्यक्तीमत्त्व व सांस्कृतिक प्रतीकांचे प्रतिनिधित्व केवळ हिंदी कलाकारांपुरतेच मर्यादित राहिले असून याबाबतीत दाक्षिणात्य कलाकार व दाक्षिणात्य इंडस्ट्री दुर्लक्षित राहिले असं आम्हाला वाटतं. मी माझ्या भावना दु:खी मनाने व्यक्त करत असून या गोष्टीला योग्य प्रकारे विचारात घेतली जाईल अशी आशा व्यक्त करते”, असं उपासनाने पत्रात लिहिलं. उपासना ही चिरंजीवी यांचा मुलगा राम चरणची पत्नी आहे.

उपासनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला साथ दिली. ‘कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तुम्ही ते केलंत’, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटवर दिली. मोदींच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात निर्माते दिल राजू ही एकच तेलुगू सेलिब्रिटी उपस्थित होती.

First Published on October 20, 2019 12:04 pm

Web Title: south stars ram charan wife upasana questions pm modi for limiting cultural icons only to hindi artists ssv 92