तमिळ सुपरस्टार अजित कुमार कायमच चर्चेत असतो. ‘विश्वासम’, ‘वेदालम’ आणि ‘वीरम’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अजितचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता अजितच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पण त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अजितच्या एका फॅन क्लबने या संदर्भात ट्विट केले आहे. ‘आज अजितच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या कुटुंबीयांना मदत करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा’ या अशायचे ट्विट केले आहे. तसेच या ट्विटमध्ये त्या चाहत्याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्या चाहत्याने त्याच्या संपूर्ण शरीरावर अजितचे नाव, त्याच्या चित्रपटातील डॉयलॉगचे टॅट्यू काढल्याचे दिसत आहे.

तमिळ सुपरस्टार अजित कुमार ‘थाला’ या नावाने ओळखला जातो. त्याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘एन वीजु एन कानावर’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी अजित कुमारला तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये आणले. त्याने आजपर्यंत ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमरावती’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्यातील वेदालम, आरमबम, वीरम, येन्नई अरिंधाल आणि विवेगम हे चित्रपट हिट झाले.