दक्षिणात्य सुपरस्टार विजय हा सतत चर्चेत असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. विजयचा ‘मास्टर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलीच पसंती दिली होती. आता विजयचा ‘Thalapathy 65’ हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेलसन दिलीपकुमार करणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकतीच नवाजने स्पॉटबॉयला मुलाखत देत या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. “प्रत्येक अभिनेत्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. लॉकडाउनच्या काळात मी जगभरातील अनेक चित्रपट पाहिले. प्रत्येक चित्रपट, प्रत्येक अभिनेत्याकडून मला काहीतरी शिकायला मिळाले. स्टेज, स्ट्रीट प्ले ते सिनेमांपर्यंत अभिनय करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. मी कलाकारांचे कौतुक किंवा प्रशंसा करत नाही. मी त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतो,” असे नवाज म्हणाला.

पुढे तो म्हणाला,” ‘इन द मूड फॉर लव्ह’ हा हाँगकाँगचा चित्रपट मी पाहिला. त्यातील टोनी लेंगचा अभिनय पाहून मी प्रभावित झालो. मला वाटले की ‘बर्डमॅन’मधील मायकल कीटनची भूमिका ही अप्रतिम होती. पण ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’मधील अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओचा अभिनय मला सगळ्यात जास्त आवडला. कसलाही विचार न करता त्याने शक्य तितक्या वेगळ्या पद्धतीने ती भूमिका साकारली. मला त्याच्या अभिनयातील अनिश्चितपणा खूप आवडला.”

नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार या चर्चा कशा सुरू झाल्या होत्या?

नवाजुद्दीन लंडनमध्ये ‘संगीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून परत आल्यानंतर ‘Thalapathy 65’चा दिग्दर्शक नेलसन दिलीपकुमारने नवाजुद्दीनची भेट घेतली होती. तसेच निर्मात्यांनी या भूमिकेसाठी नवाजद्दीनला पसंती दिली होती. नवाजुद्दीनने चित्रपटाची स्क्रिप्ट पाहिली, परंतू त्याने अजूनही हा चित्रपट साइन केलेला नाही. पण नवाजने दिग्दर्शकांची भेट घेतली आणि चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली त्यामुळे सोशल मीडियावर या चर्चा रंगल्या होत्या.