पाककृतींपासून ते बाइक रायडिंगपर्यंतचे व्हिडीओ करून ते यूटय़ूबवर अपलोड करायचे आणि लाखो व्हय़ूज मिळवायचे. हा छंद जोपासणाऱ्यांपासून ते अगदी व्यावसायिक पद्धतीने यूटय़ूब वाहिनी चालविणाऱ्यांपर्यंतचे हजारो अपलोड्स दिवसाला होत असतात. अशा यूटय़ूब व्हिडीओ निर्मात्यांना व्हिडीओनिर्मितीच्या प्रशिक्षणापासून ते इतर निर्मात्यांशी व्यावसायिक नाते जोडण्याची संधी मिळणार आहे. यासाठी यूटय़ूबने मुंबईत स्वत:ची जागा निर्माण केली आहे. गोरेगांव येथील चित्रपटनगरीतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमध्ये यूटय़ूबने जागा घेतली असून तेथे संस्थेतील विद्यार्थ्यांबरोबरच यूटय़ूब व्हिडीओ निर्मात्यांना व्हिडीओनिर्मितीचे प्रशिक्षण मिळणार आहे. इतकेच नव्हे तर इतर यूटय़ूब व्हिडीओ निर्मात्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी व्यावसायिक नाते जोडण्याची संधीही मिळणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी चित्रीकरण, एडिटिंग आणि यूटय़ूबवर अपलोडिंगही करता येणार आहे. यूटय़ूबने आत्तापर्यंत टोकियो, लॉस एंजेलिस, लंडन, न्यूयॉर्क, ब्राझील आणि बर्लिन येथे अशा प्रकारची ‘यूटय़ूब स्पेस’ निर्माण करून दिली आहे. मुंबईत सुरू होणारी देशातील पहिलीच ‘यूटय़ूब स्पेस’ असणार आहे. भारतातून यूटय़ूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांची संख्या ही गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. यामुळे देशातील या यूटय़ूबकरांना जोडून ठेवण्यासाठी तसेच देशातील उदयोन्मुख हुशारी जगासमोर येण्यासाठी ही ‘स्पेस’ विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन मीडियावर देशातील नवीन चित्रपटनिर्माते यशस्वी व्हावेत हाही यामागचा उद्देश असल्याचेही यूटय़ूबचे एशिया पॅसिफिकप्रमुख डेव्हिड मॅक्डोनल्ड यांनी स्पष्ट केले. तर यामुळे भविष्यातील ऑनलाइन मनोरंजनाला प्रोत्साहन मिळेल. तसेच याचा माध्यमाचा संस्थेतील अभ्यासक्रमात सहभाग असल्याचे व्हिसलिंग वूड्सच्या अध्यक्ष मेघना पुरी यांनी स्पष्ट केले. ही सुविधा २०१५च्या अखेपर्यंत सर्वासाठी खुली होणार आहे.