मुंबई विद्यापीठात रंगलेल्या महोत्सवाची उद्या सांगता

समाजातील महिलांचे स्थान तसेच त्यांची भूमिका दर्शवणाऱ्या चित्रपटांचा ‘वुमेन्स फिल्म फेस्टिव्हल’ सध्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सुरू आहे. मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे, प्रभात चित्र मंडळ आणि अयाम क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आज, मंगळवारी ‘स्पर्श’, ‘फिराक’ आणि ‘गंगूबाई’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये ‘कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषाभवन सभागृहा’त हा फेस्टिव्हल होत आहे. १४ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाचा शुभारंभ गेल्या वर्षी गाजलेल्या अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाने झाला. १३ मार्चला सकाळी ११ वाजता सई परांजपे दिग्दर्शित, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्पर्श’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ‘फिराक’ हा नंदिता दास दिग्दर्शित चित्रपट दाखवण्यात येणार आहे. प्रिया कृष्णस्वामी दिग्दर्शित ‘गंगूबाई’ हा २०११ साली प्रदर्शित झालेला चित्रपट दुपारी ४ वाजता दाखवण्यात येणार आहे.

फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात अपर्णा सेन यांच्या ‘जापनीज वाइफ’ या चित्रपटाने होणार आहे. सकाळी ११ वाजता हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता शोनाली बोस दिग्दर्शित कोंकणा सेन शर्मा हिची मुख्य भूमिका असलेला ‘अमू’ हा चित्रपट दाखवण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजता मीरा नायर दिग्दर्शित ‘क्वीन ऑफ कात्वे’ या हॉलीवूडपटाने समारोप होणार आहे.