पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेला डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रम भाग १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मोदींचा सहभाग असलेल्या या विशेष भागाने जगातील सर्वाधिक ट्रेंडिग शो होण्याचा मान मिळवला असून ३६० कोटी इम्प्रेशन या भागाला जगभरातून मिळाल्याचे बेअरने काही दिवसांपूर्वी ट्विट करुन सांगितले. जागतिक स्तरावर विक्रम करणारा हा विशेष भाग आता नेटकऱ्यांना नेटफ्लिक्सवरही पाहता येणार आहे. यासंदर्भात नेटफ्लिक्सनेच माहिती दिली असून हा भाग जगभरातील नेटफ्लिक्स युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

जगभरात १५ कोटी १० लाखांहून अधिक युझर्स असणाऱ्या नेटफ्लिक्सवर हा भाग उपलब्ध झाल्याने तो आता जगभरातील नेटकऱ्यांना कधीही कुठेही पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स हे १९० देशांमध्ये सेवा पुरवत असल्याने मोदी आणि बेअरचा हा साहसी प्रवास डिस्कव्हरीच्या माध्यमातून ज्या देशांमध्ये पोहचला नाही तेथील युझर्सलाही पाहता येणार आहे.

या खास भागामध्ये साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील घनदाट जंगलामधून प्रवास करताना दिसले. या कार्यक्रमामध्ये मोदींनी बेअरबरोबर अनेक गोष्टी शेअर केल्या. यात अगदी त्यांचे बालपण कसे गेले इथपासून ते त्यांचा जंगलात राहण्याचा अनुभव इथपर्यंत अनेक गोष्टींवर मोदींनी चर्चा केली. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी या विशेष भागाचे चित्रिकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर देशाच्या प्रमुखपदी असताना ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये सहभागी होणारे पंतप्रधान मोदी हे केवळ दुसरे नेते ठरले.