काळ कितीही झपाट्याने पुढे पुढे धावत असला तरीही भूतकाळ त्याचा पाठलाग करीतच असतो. जग संगणकाच्या माध्यमातून कितीही जवळ येत असले किंवा घराघरात दूरदर्शन किंवा चित्रवाणी संचाने कुटुंबाचा कब्जा घेतला असला तरीही दोन शतकांहून अधिक काळापूर्वी जन्मास आलेल्या ध्वनीप्रयोग अर्थात रेडिओ त्यांच्यामुळे नामशेष झाला नाही तर तो आजही सर्वांचा मित्र म्हणून सर्वांसोबत आहे. विशेषतः संगीत प्रेमींसाठी तर त्यांच्या आयुष्यातील रेडिओचे स्थान हे जिवलगासारखेच आहे.

अशा या रेडिओच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील कोण्या एका सुवर्णकाळातील संगीतपर्व गाजविणाऱ्या गुणी परंतू दुर्लक्षित अशा संगीतकारांचा त्यांच्याच लोकप्रिय ठरलेल्या गीताद्वारे सन्मान करण्याची संकल्पना आता रंगभूमीवर सादर केली जाणार आहे, ‘रेडिओवाणी’ या नावाने हा कार्यक्रम येत्या ४ डिसेंबरला सादर करण्यात येणार आहे.

गिटार वादक प्रदीप दळवी, लेखक संगीतकार रत्नाकर पिळणकर, वास्तुरचनाकार नंदकिशोर कदम आणि सॅक्सोफोन वादक अशोक मुरकर अशा चार मित्रांनी एकत्र येऊन ‘प्राण प्रॉडक्शन’ या नावाची संस्था स्थापन केली आहे. यामधून ते जुन्या काळातील गाणी नवनव्या संकल्पनांद्वारे आपल्या वाद्यवृंद वादक व गायकांच्या सहकार्याने रंगभूमीवर आणणार आहेत. या रेडिओवाणी वाद्यवृंदाचा पहिला कार्यक्रम रविवार ४ डिसेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता शिवाजी नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे.

ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील लोकप्रिय अरेंजर अशोक जाधव यांचे संगीत संयोजन या कार्यक्रमाला लाभले असून रफी, किशोर, तलत, मुकेश, लता, आशा, शमशाद, मुबारक अशा गायकांची गाणी डॉ. अपर्णा मयेकर, वैशाली फडके, संध्या राव, शुभदा वेरेकर, राजश्री जाधव, अरुण तळेगावकर, ईश्वरी सोलंकी आणि नंदकिशोर कदम असे पार्श्वगायक सादर करतील.

रत्नाकर पिळणकर यांनी या संकल्पनेचे लेखन, दिग्दर्शन व निवेदन केले असून नकलाकार कमलाकर बनसोडे त्यांना यात साथ देणार आहेत. संगीतकार चित्रगुप्त खेमचंद प्रकाश, सी अर्जुन, इकबाल कुरेशी, स्नेहल भाटकर, रोशन, उषा खन्ना, रामलाल, अशा प्रसिध्दी लुप्त झालेल्या संगीतकारांची सर्वोत्कृष्ट यादगार गीते आणि सोबत त्या गीतनिर्मितीचे चटपटीत खुमासदार किस्से यात सादर केले जातील. ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील हा नवा प्रयोग संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल असे निर्माता दिग्दर्शक आणि कलावंतांना वाटते.