मुंबईतील डबेवाले हा सा-या जगात कुतूहलाचा विषय आहे. डबेवाल्यांची आणि त्यांच्या कामांची महती इतकी आहे की, परदेशातून त्यांना भेटण्यासाठी मोठमोठी माणसं येतात. कशाची चूक न होऊ देता ज्याचा डबा त्याच्याच हातात ते पोहोचवतात. यासाठी ते कोणतही तंत्रज्ञान वापरत नाही. दिवसरात्र धावपळ करणा-या या मुंबईच्या डबेवाल्यांचं जरा मनोरंजन व्हावं यासाठी ‘झाला बोभाटा’ या सिनेमाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. या स्पेशल शोला डबेवाल्यांवर पीएचडी केलेले डॉ. पवन अग्रवाल आणि त्यांचे सहकारी आणि १००  पेक्षा जास्त डबेवाल्यांनी उपस्थिती लावली होती. हा स्पेशल शो निर्माते साईनाथ राजाध्यक्ष यांनी आयोजित केला होता.

‘झाला बोभाटा’ हा सिनेमा नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम, मयुरेश पेम, तेजा देवकर, दिपाली आंबीकर आणि मोनालिसा बागल यांच्या भूमिका आहेत. तर या सिनेमाचं दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी तर निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केलं आहे.

मनोरंजनातून सामाजिक संदेश
‘झाला बोभाटा’ चित्रपटात ग्रामीण पाश्र्वभूमीवरील निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘देऊळ’, ‘नारबाची वाडी’, ‘पोस्टर बॉईज’ नंतर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत मी प्रेक्षकांना दिसेन. या चित्रपटात मी ‘आप्पासाहेब झेले’ ही भूमिका करत असून गावात वाईट गोष्टी घडू नयेत, सामाजिक सुधारणा व्हाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चित्रपटाच्या अखेरीस एक ‘आयटम सॉंग’ असून त्यात मी ‘रॉक स्टार’च्या वेषभूषेत आहे.
– दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते