दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा आज संपन्न होणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण बॉलिवूड आणि दोघांच्याही चाहत्यांचं लक्ष लागून आहे. नुकतंच पारंपरिक कोंकणी पद्धतीनं दीप-वीरचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर मोठ्या संगीत कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या दोघांच्या लग्नातल्या खास क्षणांचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र दीप वीर दोघांनीही लग्नातले कोणत्याही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवली आहे. त्यामुळे आतापर्यंतचा या सोहळ्यातील एकही फोटो समोर आलेला नाही. तर दुसरीकडे इतर कोणाच्याही हाती लग्नातले फोटो लागणार नाही याची पुरेपुरे काळजी घेण्यात आली आहे.

कास्टा दिवा रिसॉर्टमध्ये रणवीरसाठी तर व्हिला दी इस्टमध्ये दीपिकाच्या कुटुंबियांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्याला खास रिस्ट ब्रँड देण्यात आले होते. तसेच प्रत्येकाला विशिष्ट कोड असलेला इ-पासही देण्यात आला होता. या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश करू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं हा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजत आहे. येथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्ती घालत आहे.

व्हिला दी बाल्बिआनेलोमध्ये दीप वीरचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. १३ व्या शतकातील या आलिशान व्हिला परिसरातील सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. स्थानिक नाविकांना या परिसरात कोणत्याही व्यक्तीला न आणण्याची सूचना दिली आहे. जे पर्यटक पर्यटनासाठी नाव भाड्यानं घेतील त्यांचीही कसून चौकशी करण्यात यावी स्थानिक व्यतिरिक्त इतरांना नाव भाड्यानं देताना चौकशी करून मगच द्यावी अशाही सूचना केल्या असल्याचं समजत आहे.