01 October 2020

News Flash

Spider Man Homecoming Movie Review : स्पायडरमॅनचे जाळे

‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ या त्याच्या तिसऱ्या अवतारपटामुळे स्पायडीचा एक नवाच अध्याय सुरू झाला आहे..

बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि लोकप्रिय सुपरहिरो ‘स्पायडरमॅन’ पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. १९६२ साली कॉमिक्समधून या सुपरहिरोचा जन्म झाला. पुढे कार्टून, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रवास करणारी ही व्यक्तिरेखा लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी गाठेल असे खुद्द त्याचा जन्मदाता ‘स्टॅन ली’ला देखील वाटले नव्हते. परंतु त्या वेळी अमेरिकेत वाढलेला अतिव्यक्तिवाद आणि कुटुंबविघटनामुळे एकटय़ा पडलेल्या मुलांनी स्वत:चे अस्तित्व त्यांच्यासारख्याच सामान्य दिसणाऱ्या तरुणामध्ये पीटर पार्करमध्ये शोधले. त्याचं सामान्य असणं आणि सुपरपॉवर मिळाल्यानंतर त्याने समाजासाठी त्याचा वापर करणं हे पीटरच्या साध्या स्वभावाला अनुसरून होतं. त्यामुळे तो तरुणवर्गाला स्वत:सारखा, अगदी जवळचा वाटला. आणि पाहता पाहता तो ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’ यांच्याइतकाच प्रभावी सुपरहिरो म्हणून नावारूपाला आला. ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ या त्याच्या तिसऱ्या अवतारपटामुळे स्पायडीचा एक नवाच अध्याय सुरू झाला आहे..

‘स्पायडरमॅन’ ही एकटय़ा पडलेल्या, लाजाळू, नकारात्मक भावना, एकलकोंडा आणि आत्मविश्वास नसलेल्या पीटर पार्कर या एका अतिसामान्य मुलाची यशोगाथा आहे. याआधीच्या दोन स्पायडरमॅन फ्रँचाईझीपटांतून आपण तो अनुभवला आहे. मात्र तिसऱ्यांदा स्पायडीची कथा प्रेक्षकांसमोर आणताना तो एका वेगळ्या संकल्पनेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ या चित्रपटाचा शेवट जिथे झाला होता तिथूनच स्पायडरमॅनची सुरुवात होते. ‘कॅप्टन अमेरिका वर्सेस आयर्नमॅन’ युद्धात पराक्रम गाजवणारा पीटर पार्कर हा टोनी स्टार्कने भेटस्वरूपात दिलेला ‘स्पायडरसूट’ घेऊन घरी परततो. आजी आणि मोजकेच शाळकरी मित्र या लहानशा विश्वात जगणाऱ्या पीटरचे आयुष्य त्या युद्धामुळे एकाएकी पार बदलून जाते. आता पीटर ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या सुपरहिरोंच्या फौजेत भरती होण्याची स्वप्ने पाहू लागतो. दरम्यान, एलियन टेक्नोलॉजी चोरून त्यापासून हत्यारे बनवणाऱ्या एका गुन्हेगार टोळीचा सुगावा त्याला लागतो. पुढे त्यांना रोखण्यासाठी स्पायडरमॅनने केलेले प्रयत्न, त्यात त्याला आलेले अपयश आणि त्यावर मात करत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पीटरची सुरू असलेली धडपड या पाश्र्वभूमीवर ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ या चित्रपटाची पटकथा उभी राहते. शेवटी आयर्नमॅनकडून मिळालेले आव्हान पीटर स्वीकारतो आणि स्पायडरसूटशिवाय शत्रूवर विजय प्रस्थापित करतो.

स्पायडरमॅनची आजवर दशकानुदशके  चालत आलेली कथा आणि या चित्रपटाची पटकथा यात काहीच साम्य नाही. आजवर आपण पाहिलेला स्पायडरमॅन हा कॉमिक्स आणि कार्टूनमधून पुढे आलेला आहे. त्यामुळे चित्रपटांतही तो एका विशिष्ट  चौकटीतच अडकलेला होता. त्याचा संपूर्ण पराक्रम न्यूयॉर्क शहरापुरताच मर्यादित होता. परंतु, ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मध्ये लेखकाने त्याला त्या चौकटीतून बाहेर काढले आहे. तसेच चित्रपटात अनेक लहानमोठे धागेदोरे सोडले आहेत जेणेकरून त्याचा वापर स्पायडरमॅनच्या सिक्वलसाठी त्यांना करता येईल, अशी सोय केली आहे. एकंदरीत काय तर चित्रपटाच्या पटकथेची निर्मिती ही एक लांबलचक चित्रपटमालिका तयार करता यावी या अनुषंगानचे केलेली आहे.

‘लोगन’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘आयर्नमॅन’, ‘एक्समॅन’ हे काही मोजके  सुपरहिरो सोडले तर दुहेरी व्यक्तिमत्त्व हे सुपरहिरोंचे वैशिष्टय़ असते. या मंडळींचे मूळ व्यक्तिमत्त्व हे कायम दुर्लक्षित, अतिसामान्य असते. परंतु सुपरहिरोचा वेश  परिधान केल्यावर ते साऱ्या जगाचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करतात. अशा चित्रपटात अभिनय करणे हे त्या अभिनेत्याच्या कलेला मिळालेले आव्हान असते. आणि त्याला ते आव्हान यशस्वीपणे पेलता आले तर तो त्या सुपरहिरोच्या प्रतिमेत लोकप्रिय होतो. ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेलाही ते लागू पडते. याआधी टॉबी मॅग्वायर आणि अ‍ॅण्ड्रय़ू गारफिल्ड या दोन अभिनेत्यांनी स्पायडरमॅन साकारला आहे. यातील पहिली चित्रपटमालिका प्रचंड गाजली व दुसरी मात्र फसली. अनेक चाहत्यांनी त्याचे खापर अ‍ॅण्ड्रय़ू गारफिल्डवर फोडले. त्यांच्या मते त्याला अभिनय करताच आला नाही. पण याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर हेही लक्षात येते की टॉबी मॅग्वायर हा स्पायडरमॅन म्हणून प्रचंड गाजला पण त्यानंतर इतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात त्याला आपल्या अभिनयाची छाप सोडता आलेली नाही. पण अ‍ॅण्ड्रय़ू गारफिल्ड हा स्पायडरमॅन म्हणून जरी फसला असला तरी पुढचाच चित्रपट ‘हॅकसॉ रिज’मधून त्याने थेट ऑस्कर नामांकन मिळवून जगाला तो एक उत्तम अभिनेता आहे हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे अ‍ॅण्ड्रय़ूपेक्षाही पटकथेतच त्याची व्यक्तिरेखा फसली असल्याने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ ही चित्रपट मालिका अपयशी ठरली. या दोघांच्या तुलनेने अभिनेता ‘टॉम हॉलंड’ हा स्पायडरमॅनच्या भूमिकेत चपखल बसला आहे. त्याचे वय आणि अभिनय व्यक्तिरेखेला साजेसे आहे. त्यामुळे त्याने साकारेलल्या स्पायडरमॅनचा चांगलाच प्रभाव पडला आहे.

‘जॉन वॅट्स’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एखादी लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारताना जितके दडपण अभिनेत्यावर असते त्याहून कैकपटीने दिग्दर्शकावर असते. जॉन यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. ‘आयर्नमॅन’ हे या चित्रपटातील प्रमुख आकर्षण होते. १९६३ साली कॉमिक्स आणि २००८ साली चित्रपटातून जन्माला आलेला हा सुपरहिरो आज जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. त्यामुळे एकाच चित्रपटात दोन समान ताकदीच्या व्यक्तिरेखेंचे दिग्दर्शन करणे हे खरे आव्हान होते. या दोन्ही व्यक्तिरेखा पूर्णपणे भिन्न आहेत. एकीकडे पीटर पार्कर हा लाजाळू, मध्यमवर्गीय कुटुंबातला विद्यार्थी तर दुसरीकडे गर्भश्रीमंत, हुशार, बिनधास्त टोनी स्टार्क  अर्थात आयर्नमॅन यांची एकत्रित केमिस्ट्री ही या चित्रपटातील खरी गंमत आहे. ‘स्पायडरमॅन’ स्वत:ची ओळख निर्माण करू  पाहतोय तर ‘आयर्नमॅन’ एक सुपरहिरो म्हणून नावारूपाला आलेला आहे. ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे बाळगणाऱ्या व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने उत्तम रीतीने उभ्या केल्या आहेत. त्याला उत्तम मॉडेल्सनिर्मिती, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी या तांत्रिक बाजूंची सर्वोत्तम जोड मिळाली आहे.

जेव्हा आपल्याकडे एक जगावेगळी शक्ती येते तेव्हा त्या शक्तीबरोबर त्याचा वापर, त्याचे नियंत्रण आणि परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने वागणे गरजेचे असते. अन्यथा त्याचे वाईट परिणाम केवळ त्या सुपरहिरोलाच नाही तर निष्पाप लोकांनाही भोगावे लागतात. दिग्दर्शकाने या तत्त्वज्ञानाचे जाळे आयर्नमॅनच्या भूमिकेतून चित्रपटात विणले आहे. स्पायडरमॅनच्या गोंधळलेल्या शक्तीला एक दिशा देण्याचे काम आयर्नमॅनने केले आहे. स्पायडरमॅन या सुपरहिरो प्रतिमेपेक्षाही त्याच्या मूळ व्यक्तिमत्त्वावर पीटर पार्करवर दिग्दर्शकाने दिलेला भर ही या चित्रपटाची महत्त्वाची बाजू ठरली आहे. इथे सुपरहिरोच्या मुखवटय़ामागे जगणारा नायक ही पारंपरिक चौकटच दिग्दर्शकाने मोडून काढली आहे. त्यामुळे येत्या काळात या नव्या स्पायडरमॅनभोवती विणलेले कथेचे जाळे हे आणखी विस्तारित स्वरूपाचे, अधिक खोलात जाऊन मांडणी करणारे असेल यात शंका नाही.

– मंदार गुरव

mandar.gurav@indianexpress.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2017 4:01 am

Web Title: spider man homecoming movie review iron man hollywood katta part 23
Next Stories
1 ‘अल्लाउद्दीन’साठी महाराष्ट्रात शोधमोहीम
2 जस्टिन बिबरला पछाडून केटी ठरली ‘ट्विटर’ सम्राज्ञी
3 टॉम क्रुजचे पुनरागमन
Just Now!
X