बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपला आगामी चित्रपट ‘बँक चोर’चे सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटात रितेश एका चोराची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. आजकाल सिनेमाचे प्रमोशन इतरांपेक्षा वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने कसं करता येईल याकडे अभिनेत्यांचे जास्त लक्ष असते. रितेशसुद्धा मग यामध्ये मागे कसा राहणार? रितेश दुसऱ्या सिनेमांचे पोस्टर आणि डायलॉग चोरून ‘बँक चोर’चं प्रमोशन करत आहे. याशिवाय नुकतीच रितेशने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलाखतसुद्धा (स्पूफ व्हिडिओ) घेतली आहे. अत्यंत गमतीशीर आणि विनोदी अशा या मुलाखतीला अनेकांनी पसंत केले आहे.

या मुलाखतीमध्ये रितेशसोबत ट्रंप बसले आहेत जे रितेशच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. रितेशने सेलिब्रिटींच्या जुन्या मुलाखतींमधील काही क्लिप्स उचलून हा नवीन व्हिडिओ तयार केला आहे. या मुलाखतीचे नाव ‘बकवास विथ बँक चोर’ असे आहे. हा व्हिडिओ रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

बँकमधील चोरीवरच आधारित हा चित्रपट असल्याने प्रमोशनसाठी रितेश चोरी या संकल्पनेचा अत्यंत गमतीशीर पद्धतीने वापर करताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रंपसोबतच रितेशने किंग खानच्याही मुलाखतीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

वाचा : सलमान खानच होस्ट करणार ‘बिग बॉस ११’

‘बँक चोर’ हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये रितेश देशमुखसोबत विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्तीसुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहेत. रितेशचा प्रमोशनचा हा नवा फंडा प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तितकाच आवडेल का हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.