News Flash

श्रीलंकेतून आली, तिखट झाली..

एकीकडे हुमा कुरेशीसारखी अभिनेत्री बॉलीवूडमध्ये खूप भेदभाव आहे, असे ओरडून सांगते आहे.

एकीकडे हुमा कुरेशीसारखी अभिनेत्री बॉलीवूडमध्ये खूप भेदभाव आहे, असे ओरडून सांगते आहे. तर दुसरीकडे पार श्रीलंकेतून आलेली जॅकलिन मी बाहेरची आहे, बॉलीवूडमधली नाही, ही भावना कधीच शिवली नाही, असे ठामपणे सांगते. बॉलीवूडमध्ये परदेशातून आलेल्या नायिका खूप आहेत, मात्र त्यांच्यापैकी इथे स्थिरावलेली नावं अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्यात या घडीला कतरिना कैफनंतर जॅकलिन फर्नाडिझचंच नाव घ्यावं लागेल इतक्या वेगाने ती बॉलीवूडच्या मोठय़ा कलाकारांबरोबर काम करीत सुटली आहे.
गेल्या महिन्यात जॅकलिनचा ‘ढिश्शूम’ प्रदर्शित झाला. ज्यात तिने वरुण धवन आणि जॉन अब्राहम दोघांबरोबर काम केलं होतं. लागोपाठ ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोची परीक्षक म्हणून छोटय़ा पडद्याचाही तिने ताबा घेतला आहे. आता या महिन्यात टायगर श्रॉफबरोबरच ‘फ्लाइंग जाट’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. व्यावसायिक हिंदी चित्रपटांमध्ये स्वत:ला फिट बसवणाऱ्या जॅकलिनने आपण लवकरच ग्लॅम गर्ल या आपल्या प्रचलित प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका करणार असल्याचे जाहीर केले. आणि तिला तसा चित्रपटही मिळाला आहे. सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन एका अ‍ॅक्शनपॅड चित्रपटात काम करीत आहेत. ‘दोस्ताना’ फेम दिग्दर्शक तरुण मनसुखानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बॉलीवूडमधील आपली घोडदौड काहीशी विलक्षण आहे, असे जॅकलिन म्हणते. ‘मला स्वत:ला हा प्रवास चमत्कारिक वाटतो पण बॉलीवूडमध्ये माझे चांगले स्वागत झाले. इथल्या लोकांनी मला कधीही मी बाहेरची आहे, ही जाणीव करून दिली नाही आणि म्हणूनच मी आज इथे यशस्वी ठरले आहे,’ असे जॅकलिन म्हणते.
२००९ मध्ये तिने रितेश देशमुखबरोबर ‘अल्लादीन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘मर्डर २’ सारखा चित्रपट केला. पण लगेचच तिच्या कारकीर्दीने एक अजब वेग पकडला. तिने सलमान खानबरोबर ‘किक’मध्ये काम केले. मग अक्षय कुमार, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम, सैफ अली खान अशा बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांबरोबरचे चित्रपट तिला मिळाले. यातले सगळे चित्रपट हे बॉलीवूडच्या मसाला पठडीतले असल्याने ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आणि त्यामुळेच असेल पण जॅकलिनला इथे मोठय़ा चित्रपटांसाठी मार्ग मोकळा झाला. मी इथे आले तेव्हा माझ्यासाठी भाषा ही मोठी अडचण होती. पण मी भाषेवर मेहनत घेतली. माझ्या आजूबाजूच्या लोकांनी भाषेसाठीही मला मदतच केली, त्यामुळे फार कमी काळात मला भाषेच्या समस्येवर मात करता आली, असे जॅकलिनने सांगितले. पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतर काही चांगल्या लोकांशी आपली भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे, सहकार्यामुळेच बॉलीवूडची ही वाट सुकर झाल्याचे जॅकलिन मान्य करते. चित्रपटाची गाडी चांगली धावत असताना तिने ‘झलक दिखला जा’सारखा शो घेण्याचे कारण काय? पैसा हे एक उत्तर असले तरी टीव्हीची व्याप्ती मोठी आहे, असे ती म्हणते. चित्रपट पाहण्यासाठी लोकांना पैसे खर्च करून चित्रपटगृहापर्यंत यावे लागते. टीव्हीचे तसे नाही..घराघरात टीव्ही असल्याने तुमचा शो चांगला असेल तर तुमची लोकप्रियता किती तरी पटीने वाढते. सिनेमा आणि टीव्ही या दोन माध्यमांमध्ये वरचढ कोण, हे मला सांगता येणार नाही. पण टीव्हीमुळे आपला चेहरा वेगाने लोकप्रिय होतो हे वास्तव असल्याचे तिने सांगितले.
‘झलक दिखला जा’मध्ये परीक्षक म्हणून एक जबाबदारीची भूमिका असल्याचे जॅकलिन सांगते. या शोमधले स्पर्धक आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांची गुणवत्ता आपण कशी जोखायची, अशी शंका सुरुवातीला होती. मात्र म्हणूनच एक जबाबदारीची भावना जास्त वाढली. माझ्या एका निर्णयामुळे, परीक्षक म्हणून माझ्या निरीक्षणामुळे त्यांची कारकीर्द घडणार आहे किंवा पडणार आहे इतक्या गांभीर्याने विचार करूनच परीक्षकाची भूमिका बजावत असल्याचे तिने सांगतले. बॉलीवूडमध्ये व्यावसायिक चित्रपटांतून ती यशस्वी ठरली आहे, पण वेगळी भूमिका असलेले चित्रपटही तिला करायचे आहेत. माझ्यासाठी वेगवेगळ्या भूमिकांचे आव्हान घेण्याची हीच खरी वेळ आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगणाऱ्या जॅकलिनने आपल्याला खलनायिका रंगवायची इच्छा असल्याचेही सांगितले. सध्याचा तिचा बॉलीवूडमधील इच्छापूर्तीचा वेग पाहता तिची ही इच्छाही पूर्ण झाली तरी नवल वाटायला नको!

मला स्वत:ला हा प्रवास चमत्कारिक वाटतो, पण बॉलीवूडमध्ये माझे चांगले स्वागत झाले. इथल्या लोकांनी भाषेसाठीही मला मदतच केली, त्यामुळे फार कमी काळात मला भाषेच्या समस्येवर मात करता आली. लोकांनी मला कधीही मी बाहेरची आहे, ही जाणीव करून दिली नाही आणि म्हणूनच मी आज इथे यशस्वी ठरले आहे.
– जॅकलिन फर्नाडिझ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:02 am

Web Title: sri lankan actress jacqueline fernandez
Next Stories
1 ‘कान्हा’ दहीहंडीच्या राजकारणाचा काला मोठय़ा पडद्यावर
2 हृदयी धरले ‘नाटय़संगीत’
3 चित्ररंग : रहस्य मांडणीचा अनोखा प्रयोग
Just Now!
X