बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांनी त्यांच्या काकांनी श्रीदेवी फार तणावात असल्याचा मोठा खुलासा केला आहे. श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी एका तेलगू वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, त्या कुटुंबात आलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सतत चिंतीत असायच्या. ‘डीएनएने’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बोनी यांना सिनेनिर्मितीमध्ये नुकसान झाले होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यांचे हे कर्ज फेडण्यासाठी श्रीदेवी यांची काही मालमत्ता विकण्यात येणार होती. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीच १९९७ मध्ये ‘जुदाई’ सिनेमानंतर सिनेसृष्टीपासून दूर गेलेल्या श्रीदेवींना पुन्हा सिनेमांत काम करावे लागले होते.

याच रिपोर्टमध्ये हेही लिहिले की, बोनी यांनी एका सिनेमाची निर्मिती केली होती. पण तो सिनेमा कधी प्रदर्शितच झाला नाही. याआधीही श्रीदेवी यांनी काही मालमत्ता विकून कर्ज फेडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भलेही श्रीदेवी या वरुन आनंदी दिसत असल्या तरी त्या फार चिंतीत असायच्या. श्रीदेवी मोहित मारवाच्या लग्नाला दुबईला गेल्या असता तिकडे बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि जान्हवनी आणि खुशी या दोन मुली आहेत. जान्हवी यावर्षी धडक सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे तर खुशी सध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे.