अभिनेत्री श्रीदेवी यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत कधी आणले जाणार याचीही चर्चा सुरु झाली. लोकसत्ता ऑनलाइनला मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरा श्रीदेवी यांचे पार्थिव चार्टर्ड फ्लाइटने मुंबईत आणले जाणार आहे. आज रात्री उशिरा हे पार्थिव मुंबईत दाखल होईल त्यानंतर ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि उद्या म्हणजेच सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी शक्यता आहे. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.

२५ फेब्रुवारीचा रविवार हा सिनेसृष्टीसाठी काळा रविवार ठरला कारण पहाटेच्या सुमारासच श्रीदेवी यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, देशातील आणि राज्यातील राजकारणी यांनी श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांची मुलगी जान्हवी कपूर ही धडक या सिनेमातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. दुबईत झालेल्या लग्न सोहळ्यासाठी जान्हवी जाऊ शकली नव्हती. बोनी कपूर, श्रीदेवी आणि त्यांची मुलगी खुशी असे तिघे लग्नासाठी गेले होते. त्याचवेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने श्रीदेवी यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनेत्यांच्या चलतीच्या काळात स्वतःचे वेगळे स्थान टिकवूनही ठेवले. १९९७ मध्ये आलेल्या जुदाई या सिनेमानंतर त्यांनी जवळपास १२ ते १५ वर्षे ब्रेक घेतला. २०१२ मध्ये आलेल्या इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. हा सिनेमा समीक्षक आणि प्रेक्षक यांना आवडला. त्यानंतर आलेल्या मॉम या सिनेमानेही लोकांची मने जिंकली. झीरो या शाहरुखच्या आगामी सिनेमातही श्रीदेवी काम करत होत्या. मात्र शनिवारी त्या दुबईला गेल्या असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अचानक कार्डिअॅक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. आता आज उशिरा त्यांचे पार्थिव चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणले जाईल आणि उद्या म्हणजेच सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.