एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चित्रपटाबद्दली उत्सुकता आणखीनच वाढत आहे. ‘बाहुबलीssss…’, असा आवाज देत आजही राजामौली यांच्या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम असल्याचे पाहायला मिळते. हीच जादू आणि भव्यता, शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणाऱ्या कथानकाच्या जोरावर या चित्रपटाचा दुसरा भाग २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा हिंदी ज्युकबॉक्स नुकताच लाँच करण्यात आला आहे. पण, या चित्रपटाचे कथानक आणि पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये असलेल्या उत्सुकतेच्या तुलनेत चित्रपटाच्या गाण्यांना फारशी लोकप्रियता मिळत नाहीये.

‘जिओ रे बाहुबली’, ‘वीरो के वीर आ..’, ‘सो जा जरा’, ‘जय- जयकारा’, ‘शिवम’ ही गाणी ‘बाहुबली २’च्या हिंदी ज्युकबॉक्समध्ये ऐकायला मिळत आहेत. दलेर मेहंदी संजीव चिम्मालगी, रम्या बेहरा या गायकांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाच्या एकंदर कथानकाला आणि भव्य सेट्सना साजेशी अशीच ही गाणी असून, गाण्याचे पार्श्वसंगीत विशेष लक्ष वेधत आहे. पण, चित्रपटाचे भव्य स्वरुप पाहता बाहुबलीच्या या ज्युकबॉक्सला काही फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये. या चित्रपटातील गाणी अॅव्हरेज असल्याची प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली आहे.

प्रेम, युद्ध, सूडाची भावना अशा बऱ्याच चढउतारांची वळणं असणाऱ्या या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने आणि बाहुबली टीमसोबत संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीने बरीच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली २’ हिंदी, तमिळ, मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले..?’ या प्रश्नाचे उत्तर देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.