अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री सपना पब्बी बेपत्ता असल्याची चर्चा होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास एनसीबी करत असून त्यांनी सपनाला समन्स बजावले होते. मात्र सपना समन्स स्वीकारण्यासाठी घरी नसल्याचं सांगत ती बेपत्ता असल्याची माहिती एनसीबीने दिली. त्यावर आता सपनाने ट्विट करत लंडनमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्या चौकशीनंतर सुशांतसोबत ‘ड्राइव्ह’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सपना पब्बीसुद्धा एनसीबीच्या निशाण्यावर आहे. सपनाने ट्विट करत लिहिलं, ‘मी बेपत्ता असल्याचं वृत्त भारतात दाखवण्यात येत असून त्याने मी फार दु:खी आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये आहे आणि माझ्या वकिलांनी याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना आधीच दिली होती.’

एनसीबीने मंगळवारी सपनाच्या मुंबईतील निवासस्थानी समन्स पाठवले होते. मात्र तिच्याकडून काहीच उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर सपना बेपत्ता असल्याच्या चर्चांना उधाण आलं.