महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे म्हटले जाते त्यात कोणतीही अतिशोयक्ती नाही. चार मराठी माणसे एकत्र जमली की एखादी संस्था, मंडळ स्थापन करून काही ना काही उपक्रम, कार्यक्रम त्यांच्याकडून राबविले जातात. महाराष्ट्रात असे अनेक कार्यकर्ते विविध संस्थांनी घडविले असून ही सर्व मंडळी समाजाच्या विविध क्षेत्रात काम करत आहेत. यापैकी काही जण पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून तर काही जण आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून काम करत आहेत. कार्यकर्ते घडविणाऱ्या या संस्थांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्रातील या विविध सार्वजिनक गणेशोत्सव मंडळांबरोबरच अन्य विविध क्षेत्रात काम करणारी ही अनेक मंडळे असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच अन्य क्षेत्रात ती कार्यरत आहेत. या विविध मंडळांमध्ये निस्वार्थी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते हे त्या मंडळाचे खरे आधारस्तंभ आहेत. या कार्यकर्त्यांचा आणि मंडळांच्या कामाचा परिचय करुन देणारा ‘मंडळ भारी आहे’ हा आगळा कार्यक्रम ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ऊर्जा राज्यातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता ‘मंडळ भारी आहे’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. महाराष्ट्रात अशी मंडळे अक्षरश: हजारोंच्या संख्येत असून त्यातील निवडक मंडळांमधील लढत या कार्यक्रमात पाहायला मिळणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे करणार आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांमधून महाराष्ट्रातील ‘भारी मंडळ’ निवडले जाणार आहे.