सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांचे आश्वासन
‘कोर्ट’ या सिनेमाची ऑस्करसाठी (परभाषिक विभागात) शिफारस होणे ही गोष्ट फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशवासीयांसाठी आनंदाची आहे. त्यामुळेच ‘कोर्ट’ सिनेमाला ऑस्करवारीसाठी प्रोत्साहन म्हणून केंद्र आणि राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
ऑस्करसाठी आपल्याकडून ‘कोर्ट’ या सिनेमाची प्रवेशिका पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाला ऑस्करमध्ये चांगले नामांकन मिळावे म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून काय मदत करता येईल?, लॉस एजंलिस इथे या चित्रपटाची प्रसिद्धी कशी करता येईल?, याबाबत विनोद तावडे यांनी ‘कोर्ट’च्या चमूची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी ‘कोर्ट’ सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते विवेक गोम्बर, सिनेमाचे दिग्दर्शक चतन्य ताम्हाणे आणि या सिनेमात सरकारी वकिलाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्याबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह आणि इतर अधिकारी या चर्चेसाठी उपस्थित होते.
‘कोर्ट’ या सिनेमाला केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सगळ्या पद्धतीचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देतानाच विनोद तावडे यांनी केंद्राकडून सहकार्य मिळवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती दिली. या सिनेमाची लॉस एजंलिसमध्ये प्रसिद्धी आणि प्रदर्शन कशा पद्धतीने करता येईल? याबाबतचा प्रस्ताव चित्रपटाच्या चमूकडून एका आठवडय़ात सादर करण्यात येणार आहे.