पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या वादात अडकला आहे. विवेक ओबेरॉयने स्वत: हा वाद ओढवून घेतला आहे. एका वादग्रस्त ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला आहे. या ट्विटमध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेकचा फोटो वापरण्यात आला असून एक्झिट पोलवर भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाने या ट्विटची दखल घेतली असून नोटीस बजावण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितल्यानुसार, ‘विवेक ओबेरॉय यांचं ट्विट क्रिएटिव्हीटी होऊ शकत नाही. महिलांबद्दल अनादर दाखवणारं असं ते ट्विट आहे, त्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. ते जबाबदार अभिनेते आहेत, त्यांच्याकडून अशा बोलण्याची अपेक्षा होऊ शकत नाही’. ‘ते अत्यंत चुकीचं बोलले असून, राज्य महिला आयोग त्यांना नोटीस बजावणार आहे’, असंही विजया रहाटकर यांनी सांगितलं आहे.

काय आहे मीममध्ये?
एक्झिट पोल समोर आल्यापासून हे मीम व्हायरल होते आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.

हे मीम पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या टीकेचा विवेक ओबेरॉयला सामना करावा लागला आहे. विवेक तुला काय झाले आहे? तुला असे करणे शोभते का? ऐश्वर्या रायच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तू टिपण्णी का करतो आहेस ? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित करत विवेक ओबेरॉयवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयबाबत इतर मीम करत त्याचीही खिल्ली उडवली आहे.