मनोरंजन क्षेत्रात सध्या चर्चा आहे ती अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमींग वेबसाईट्सची. अनेकजण आज नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी फाइव्ह, अॅमेझॉन प्राइम यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून नवीन नवीन विषयांवरील सिनेमा आणि वेब सिरीजचा आनंद घेताना दिसता. मात्र असे असले तरी या सेवांचे दर परवडणारे नसल्याने इच्छा असूनही अनेकजण या अॅप्स आणि सेवांचे सबक्रिप्शन घेत नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने आपल्या दरमहा पॅकेजचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही सेवा फक्त भारतीय युझर्ससाठी असणार आहे.

भारतामध्ये नेटफ्लिक्सची भरपूर मागणी आहे मात्र यासाठी मोजावे लागणारे पैसे अधिक असल्याने अनेकदा तीन ते चार जण मिळून एक सबस्क्रीप्शन घेताना दिसतात. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांनी नेटफ्लिक्सचे सबक्रिप्शन घ्यावे आणि भारतामधील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने नेटफ्लिक्सने दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर कधी लागू होणार याबद्दल अद्याप कोणताही माहिती कंपनीने दिली नसली तरी या तिमाहीमध्ये भारतीयांसाठीचे नवीन आणि स्वस्त प्लॅन्स उपलब्ध करुन दिले जातील अशी माहिती समोर येत आहे. सध्या नेटफ्लिक्सवर कमीत कमी ५०० रुपये दरमहापासून प्लॅन उपलब्ध आहे.

याचसंदर्भात बोलताना नेटफ्लिक्सचे कार्यकारी अधिकारी रेड हॅस्टींग्स म्हणतात, ‘मागील अनेक महिने आम्ही भारतीय युझर्सचा अभ्यास केला. त्यानंतर आम्ही मोबाइलवरुन नेटफ्लिक्स पाहणाऱ्या भारतीय युझर्ससाठी सध्याच्या प्लॅन्सबरोबर नवीन प्लॅन्स बाजारात आणणार आहोत. तिसऱ्या तिमाहीमध्ये हे प्लॅन्स युझर्सला उपलब्ध करुन दिले जातील. या प्लॅन्समुळे नेटफ्लिक्सला भारतामधील युझर्सची संख्या वाढवण्यास तसेच भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यास मदत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारतासारख्या बाजारामध्ये पे टीव्ही सारख्या सेवा ५ डॉलरहून कमी किंमतीमध्ये उपलब्ध असल्याचे पहायला मिळते. हे प्लॅन लॉन्च केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो यातूनही आम्हाला पुढचे निर्णय घेता येईल.’

हॅस्टींग्स यांच्या वक्तव्यावरुन भारतीयांसाठी येणाऱ्या नवीन प्लॅन्सची किंमत ५ डॉलरपर्यंत म्हणजेच अंदाजे ३०० रुपये प्रती महिना इतकी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता नेटफ्लिक्सवर शेअरिंग करण्याऐवजी अनेकांना स्वत:च सबक्रिप्शन घेता येणार आहे.

नेटफ्लिक्सचे सध्याचे प्लॅन्स असे आहेत

१)
दरमहा ५०० रुपये (बेसिक प्लॅन)

२)
दरमहा ६५० रुपये (स्टॅण्डर्ड एचडी प्लॅन)

३)
दरमहा ८०० रुपये (प्रिमियम अल्ट्रा एचडी प्लॅन)