|| रेश्मा राईकवार

एकाचं दु:ख दुसऱ्याला पूर्णपणे समजून घेता येतं का? याचं ‘क्वचितच’ असं उत्तर या चित्रपटातील पात्र देतं. याच धर्तीवर पुढे जात विचार करायचा तर एकाच लेखकाने लिहिलेली कथा अनेकांच्या मनाला साद घालून गेली. त्या कथेचं सार, त्यातला भाव दिग्दर्शकाला, कलाकाराला लेखकाने पूर्णपणे जसा मांडला आहे तसा उमगेल. त्यातून त्यांना जे गवसलं आहे, त्यात त्यांच्या विचारांची, जाणिवांची भर घालत एक नवीनच कलाकृती जन्माला येईल असा प्रकारही क्वचितच घडतो. दि. बा. मोकाशींची मुळातच भावगर्भ असलेली ‘आता आमोद सुनासि आले’ ही अभिजात कथा आणि त्या शब्दरूप भावनांना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यातून सेल्यूलॉईडच्या पडद्यावर जिवंत करणारी सुमित्रा भावेंची ‘दिठी’ हा योगही क्वचितच रसिकांच्या वाट्याला येतो.

शब्दांत मांडलेलं जगण्याचं द्वैत-अद्वैताचं, मूर्त-अमूर्ताचं तत्त्वज्ञान सिनेमाच्या भाषेत पुन्हा लिहून ते कॅ मेऱ्यातून बोलकं  करणं हे सोपं नाही. त्यासाठी लागणारी ‘दिठी’ सुमित्रा भावेंनी आपल्या या शेवटच्या दिग्दर्शकीय कलाकृतीतून दाखवून दिली आहे. कोण्या रामजी लोहाराला झालेला पुत्रवियोग, त्याच्या मनात दाटून आलेला दु:खाचा कल्लोळ, हे का घडलं?, याचे उत्तर शोधत आभाळभर टिकू न असलेली त्याची रिकामी नजर. हाताशी आलेला तरुण मुलगा नियतीने असा सहज हिरावून नेल्याच्या भावनेने त्याचं मन रितं झालं आहे. या दु:खाने त्याच्या अंगी असलेलं मूळचं शहाणपण पुसून टाकलं आहे. या आपल्या शहाण्या पण दु:खाने बधिर झालेल्या मित्राचं करायचं काय?, म्हणून अस्वस्थ झालेले त्यांचे माळकरी मित्र. तर दुसरीकडे प्रसूती वेणा सोसणारी, पोटचा जीव बाहेर येत नाही म्हणून अडलेली शिवा नेमाणेची गाय. या दोन समांतर घडत जाणाऱ्या घटना, एका अवघड वळणावर एकत्र येतात. एकाचं जाणं आणि दुसऱ्याचं येणं हे जगण्यातलं द्वैत नाहीसं होतं. अद्वैताचा हा साक्षात्कार दु:खाचं मळभ दूर करतो. त्याकडे नव्याने पाहायची लख्ख दिठी म्हणजे दृष्टी देऊन जातो.

दि. बा. मोकाशींच्या मूळ कथेचा गाभा कु ठेही हरवू न देता आपल्याला सापडलेला भावार्थ कलाकृतीतून मांडण्याची विलक्षण हातोटी लेखिका-दिग्दर्शक म्हणून सुमित्रा भावे यांच्याकडे होती. ‘दिठी’ तून त्याची पुन:प्रचीती येते. रामजीवर कोसळलेलं दु:ख आणि गावावर काळं आभाळ आच्छादून टाकत कोसळणारा पाऊस या दोन्हीची धार मनाला तितकीच बोचणारी, अस्वस्थ करणारी आहे. एरव्ही पाऊस शेतकऱ्याचा मित्र, पण तो आभाळ लवंडून कोसळत राहतो तेव्हा होत्याचं नव्हतं होऊन जातं. या ओल्या संकटाखाली दबा धरून निपचित बसलेलं गाव, जागोजागी वाहणारे लाल मातीच्या पाण्याचे पाट, अनावर वेगाने वाहत जाणाऱ्या याच पाण्याच्या प्रवाहाने रामजीच्या मुलाला आत ओढून नेलं आहे, हा गावकऱ्यांना मनातला असाहाय्य सल अशा कितीतरी गोष्टी धनंजय कु लकर्णी यांचा कॅ मेरा सुंदर पद्धतीने टिपत राहतो. वास्तव चित्रणाची दिग्दर्शकाची शैली या चित्रपटाला अधिक आशयगर्भ करते. रामजी वारकरी आहे, त्याच्या दु:खातही त्याला वारी आठवत राहते, वारीतला विठ्ठल दिसत राहतो. इतकी वर्षं तल्लीन होऊन विठ्ठल भक्तीत रमणाऱ्या रामजीला, गावकऱ्यांना ज्ञानोबा माऊलींच्या अभंगांचा, आधार वाटतो. रूढार्थाने या श्लोकांचा, अभंगांचा त्यांना काही अर्थ लागत नाही. मात्र त्यांचे शब्द, सूर यांच्या तालात दु:ख विसरायला लावून नव्याने जगण्याचे बळ त्यांना सापडते. रामजीची देवावरची श्रद्धा, खरं-खोट्याचा उडालेला गोंधळ आणि नवनिर्मितीच्या एका क्षणातून जगण्याचा त्याला उलगडलेला अर्थ हे सगळं दाखवताना अभंगांचा चपखल वापर सुमित्रा भावे यांनी के ला आहे.

मुळात अशी भावगर्भ कथा चित्रपट रूपात जिवंत करायची तर त्याच्या अर्थाशी तादात्म्य होणं हे त्यातील कलाकारांना, त्या कलाकृतीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला जमायला हवं. इथे किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, गिरीश कु लकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, उत्तरा बावकर, अंजली पाटील असे एकापेक्षा एक प्रतिभावंत कलाकार आहेत. किशोर कदम यांच्यापासून रामजी भिन्न करताच येणार नाही इतके  ते या भूमिके शी एकरूप झाले आहेत. दु:खाने पोकळ झालेलं मन आणि ज्ञानाच्या साक्षात्काराने चैतन्याने भारून गेलेला रामजीचा अवघा देह… धाय मोकलून रडणारा आणि त्यानंतर मोकळा झालेला रामजी अशा संमिश्र भावनाही त्याच उत्कटतेने त्यांनी आपल्या अभिनयातून, देहबोलीतून जिवंत के ल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने जीव ओतून आपली व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दिठी’चा आशय सोपा करण्यात संवादांचीही महत्त्वाची भूमिका आहे. रामजीचे दु:ख समजते आहे, पण त्यामुळे नेमकं  आपल्या आयुष्यात काही बदललं आहे का?, याची चर्चा करताना तीन मित्रांच्या सहज संवादातून अनेक गोष्टी आकळत जातात. उत्तम कथेशी, उत्तम दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कलादिग्दर्शन, ध्वनी संयोजन, पार्थ उमराणी आणि साके त कानेटकर यांचे संगीत अशा कितीतरी घटकांनी साधलेल्या अद्वैतातून ‘दिठी’ साकारला आहे.  ज्ञानोबा माऊलींनी अमृतानुभवातून शिकवलेले जगण्याचे सार सहजी कळणे अवघड. तेच तत्त्वज्ञान सोपं, आत खोलवर मनात उतरेल अशा पद्धतीने सांगत ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यातील द्वैत संपवणारा ‘दिठी’ हा अप्रतिम भावानुभव आहे.

दिठी

दिग्दर्शक – सुमित्रा भावे

कलाकार – किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, उत्तरा बावकर, अंजली पाटील, ओमकार गोवर्धन, कै लास वाघमारे.