‘देव गडावर नाहीत..’ सेवेकऱ्याने धावत आणलेला सांगावा ऐकताच सगळ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. देव गडावर नाहीत, खाली वाडय़ावर नाहीत, मग गेले तरी कुठे देव म्हणायचे? सध्या तरी सगळे देव टेलीव्हिजनच्या खोक्यात येऊन बसले आहेत. ‘देवों के देव महादेव’ झाले, मराठीत ‘जय मल्हार’चं पर्व विसरता विसरेना अशी प्रेक्षकांची भावावस्था झाली आहे. विष्णूच्या कथा कृष्ण आणि राम दोन्हींच्या अवतारात दाखवून झाल्या आहेत. आता नवीन कोणाची तरी कथा पाहिजे म्हणून ‘जय संतोषी माँ’ची कथा सांगून झाली तशीच सध्या ‘कर्मफल दाता शनि’चाही मालिका अध्याय सुरू आहेच. तरीही हटके काही तरी पाहिजे म्हणून आता मोर्चा लोकांचं लाडकं दैवत असलेल्या गणेशाकडे वळला आहे. मराठीत ‘गणपती बाप्पा मोरया’ ही ‘कलर्स मराठी’वरची मालिका संपली. तिच्याचबरोबर ‘जय मल्हार’मध्येही बालगणेशाच्या कथेचा मोठा वाटा होता. आता हिंदीतही ‘विघ्नहर्ता गणेशा’ नव्या मोशन पिक्चर टेक्नॉलॉजीसह अवतरले आहेत. पडद्यावरचे हे देव प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतात, यात शंकाच नाही. पण या ‘देवां’च्या प्रतिमेत अडक लेल्या कलाकारांची भावना काय असते? म्हणजे ऐन गणेशोत्सवात छोटय़ा पडद्यावर ‘विघ्नहर्ता गणेशा’च्या भूमिकेत दिसणाऱ्या छोटय़ा उजैर बसरच्या मनात सध्या काय सुरू असेल, पडद्यावरची प्रतिमा सोडून सर्वसामान्यांमध्ये वावरताना आणि पुन्हा त्याच ‘देवा’ची पूजा करताना त्यांचा काही गोंधळ उडतो का?, हे त्या कलाकारांकडूनच जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

इतर कोणत्याही देवांच्या भूमिकेपेक्षा गणपतीची भूमिका साकारणं हे अंमळ अवघडच. इथे गणेशाच्या भूमिकेत दिसणाऱ्या कलाकाराचा चेहरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. त्याऐवजी सोंड लावलेल्या मुखवटय़ामागचे त्यांचे किलकिले डोळेच तेवढे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे संवादापेक्षाही डोळ्यातून भाव पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान या कलाकारांसमोर असतं. ‘मला जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर गणपती म्हणून उभं राहायचं होतं तेव्हा आमचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितलं होतं की कॅमेऱ्यात बघून बोलशील तेव्हा तुझ्या भुवया वर कर. त्या पद्धतीनेच मी सुरुवात केली’, असं ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत बालगणेशाची भूमिका साकारणाऱ्या स्वराज येवलेने सांगितलं. ‘गणपती बाप्पा मोरया’ ही स्वराजची पहिलीच मालिका होती. आणि पहिल्याच मालिकेत गणपतीची भूमिका करायची. मला सोंड लावून काम करायचं होतं. त्यामुळे नेमकं कसं बोलणार, काय हावभाव असतील हे सगळं दिग्दर्शकांनीच समजून सांगितलं. पहिल्या दिवशी जेव्हा सोंड लावली होती तेव्हा खूप दुखलं होतं. प्रचंड वैतागलेलो होतो. नंतर मात्र निर्माते महेश कोठारे यांनी त्यावर नामी उपाय शोधून काढला. त्यांनी सोंडेची संगणकीय प्रतिमा वापरायची ठरवली. त्यामुळे हे दुखणं दूर झालं आणि ती भूमिका करणं अधिक सोपं गेलं, असं स्वराज म्हणतो. गेल्या वर्षी मालिका सुरू असतानाच गणेशोत्सवाची धामधूम त्याने अनुभवली होती. यावेळी मात्र मालिका संपलेली असल्याने आता खूप वेगळंच वाटतंय, असं तो म्हणतो. माझ्या आत्याकडे दीड दिवस गणपती असतो. तिथेच आम्ही सगळे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतो. पण यावेळी मला गणपतीची गोष्ट जास्त चांगली कळली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव साजरा करताना ती भावना नक्कीच आनंद देऊन जाते, असं त्याने सांगितलं.

सोंड लावून भूमिका करणं तंत्रज्ञानामुळे स्वराजसाठी सोपं झालं. मात्र हेच तंत्रज्ञान ‘सोनी टीव्ही’वर नुकत्याच दाखल झालेल्या ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेत विघ्नहर्त्यांची भूमिका साकारणाऱ्या छोटय़ा उजैरसाठी आव्हान ठरलं आहे. या मालिकेत पहिल्यांदाच मोशन पिक्चर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हॉलीवूडपटांमध्ये प्रामुख्याने हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ज्यात कलाकाराचे हावभाव टिपून घेत संगणकीय प्रतिमा दाखवली जाते. आपल्या देवाची आणि तीही गणपतीची भूमिका करायला मिळतेय यामुळे आनंदात असलेल्या उजैरसाठी ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चं आव्हान असं काही वाटत नाही. इथे भूमिका करताना सेटवर मला हेल्मेटसारखं डोक्यावर घालावं लागतं. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटलं ते. त्या हेल्मेटच्या मदतीने कॅमेऱ्यासमोर माझ्या डोळ्यांची उघडझाप, भुवयांची हालचाल टिपली जाते. टीव्हीवरचा माझा लुक मी जेव्हा बघितला तेव्हा मी असा गणेशाच्या भूमिकेत दिसतोय यावर विश्वासच बसत नव्हता, असं उजैरने सांगितलं. एवढा मोठा सेट, हे तंत्रज्ञान वापरणारे सगळे कुशल तंत्रज्ञ, कलाकार अशी एवढी मोठी टीम सेटवर या मालिकेसाठी राबतेय. त्यामुळे जितका उत्साह आहे तितकंच दडपणही आहे असं तो म्हणतो. पण त्याला दडपण हे या लोकांचं नाही. तर एवढय़ा मोठय़ा देवाची भूमिका आपण आज प्रेक्षकांसमोर करतोय. त्यात आजूबाजूला सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने घराघरांतून गणपतीचं पूजन केलं जातंय. या वातावरणात जर माझ्याकडून एखादी चूक झाली तर? अरे हा काय करतोय.. गणपती असा असतो का, असा बोलतो का.. असं जर प्रेक्षकांना वाटायला नको. त्यामुळे मला जास्त काळजी वाटते, असं उजैरने सांगितलं. मी स्वत: गणपतीच्या कथा असलेली अनेक पुस्तकं वाचली आहेत. मी तर त्यांना माझा मित्रच मानतो, अशी बालसुलभ भावना व्यक्त करणारा उजैर आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे गणेशाची भूमिका करणं सोपं होतंय असं म्हणतो. एवढंच नाही तर खरं म्हणजे तो मालिकेत पूर्णपणे गणेशाच्या रूपात दिसणार असल्याने त्याचा खरा चेहरा मित्र-नातेवाईकांना कसा कळणार? म्हणून आपला गणेशाच्या भूमिकेतील पहिला लुक त्याने फेसबुक वर टाकला. आता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, असं तो म्हणतो. देवांची भूमिका साकारणं छोटय़ांसाठी एकवेळ सोपं ठरत असेल; पण मोठय़ा कलाकारांना मात्र त्या भूमिकेमुळे निर्माण झालेली प्रतिमा कायम जपावी लागते. ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत मोठय़ा गणेशाची भूमिका केलेल्या ऋतुराज फडकेने अजूनही आपल्याला या प्रतिमेचं भान जपावं लागतं असं सांगितलं. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेआधी मी कुठलीच पौराणिक भूमिका केलेली नव्हती. लोकांचं आवडतं दैवत आपल्याला पडद्यावर साकारायचंय याचा ताण येतोच नाही म्हटलं तरी.. शिवाय मालिकेसाठी जी वेशभूषा-दागिने असा सांभार होता ते सांभाळणं जास्त जड  गेलं. या भूमिकेसाठी मला हातात जे कडं दिलं होतं त्याचंच वजन एक किलो होतं. पण हळूहळू मला ते आवडायला लागलं आणि सेटवरही सगळे जेव्हा ‘बाप्पा.. बाप्पा’ म्हणायला लागले तेव्हा खरंच आपण गणपतीच झालो आहोत जणू असा एक भाव मनात निर्माण झाला होता. आणि त्याच थाटात सेटवरही सगळे लाड होत होते. आणि बाहेरही म्हणजे मालिका सुरू असतानाच माघी गणेशोत्सव होता. आणि फेसबुकवर दोन दिवसांनी तू आमच्याकडे येणार आहेस.., एक बाप्पा दुसऱ्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आला आहे.. असे संदेश पडत होते तेव्हा खरंच एक वेगळा आनंद झाला होता. आता ही मालिका संपल्यानंतर एक रिकामपण आल्यासारखं वाटतं आहे. ज्या रात्री मालिकेचं चित्रीकरण संपलं त्याच दिवशी सकाळी माझ्या नाटकाची तालीम सुरू झाली होती. त्यामुळे भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळालाच नव्हता. पण मालिकेत ‘शीघ्र प्रस्थान’ करूयात असे जे संवाद होते ते मात्र वारंवार तोंडी यायचे आणि गडबड व्हायची, असं त्याने सांगितलं. मालिका संपली असली तरी आपला गणरायाचा चेहरा चाहते अजून विसरलेले नाहीत, याची प्रचीती नुकतीच घेतल्याचं त्याने सांगितलं. दहीहंडीच्या वेळी फिरत असताना भूक लागली म्हणून रस्त्यावर बसून केळं खात होतो. आणि नेमकं तेव्हाच एकाने गणपती असा रस्त्यात बसून केळं खातो का?, असं गमतीने का होईना प्रश्न विचारला. त्यामुळे साहजिकच आपण नकळत कोणाच्या भावना दुखावत नाही आहोत ना याचं भान ठेवावं लागतं. थ्री फोर्थ घालून पटकन बाहेर जाता येत नाही. निदान लोकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ची प्रतिमा विसरेपर्यंत तरी हे भान जपावं लागणार असं त्याने सांगितलं.

तर ही प्रतिमा विसरण्यापेक्षा तीच चित्रपटांमधून वेगळ्या पद्धतीने पुढे कशी नेता येईल?, यावर आपण भर देत असल्याचे ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरांत प्रसिद्ध असलेल्या खंडोबा अर्थात अभिनेता देवदत्त नागे याने सांगितलं. ‘जय मल्हार’ ही मालिका म्हणजे एक आशीर्वाद होता. तीन वर्ष मालिका सुरू होती. या तीन वर्षांमध्ये गणपतीच्या मूर्ती खंडोबाच्या रूपात ठिकठिकाणी पहायला मिळाल्या. पण याहीवर्षी आम्हाला मागच्या वेळी खंडोबाच्या रूपातील गणेशमूर्ती मिळाली नव्हती. यावेळी आवर्जून तीच मूर्ती घेतली आहे, असे सांगणारे दूरध्वनी आले आणि आनंद झाला, असं देवदत्तने सांगितलं. खंडोबा म्हटलं की आम्हाला तुझाच चेहरा समोर येतो, असं लोकं आवर्जून सांगतात.

हल्लीच एका कामानिमित्त कार्यालयात बसलेलो असताना तिथे कोल्हापूरचे एक उद्योजक आले आणि त्यांनी खंडोबा म्हणून पायावर डोकं ठेवलं. अशा वेळी खूप अवघडल्यासारखं होतं. पण त्यांच्या भावना दुखावता येत नाहीत, असं त्याने स्पष्ट केलं. ‘जय मल्हार’ मालिकेमुळे लोकांना एक रांगडा नायक मिळाला होता. आता हीच रांगडय़ा नायकाची प्रतिमा चित्रपटांतूनही पुढे नेण्याचा आपला विचार असून त्याच प्रकारे काम करतो आहे, असंही त्याने सांगितलं. पडद्यावर ‘देवां’ची प्रतिमा साकारताना ती लोकांना आवडेल की नाही हे दडपण कलाकारांवर असतं. एकदा ती लोकप्रिय ठरली की त्यामुळे येणारी प्रसिद्धी आणि मग त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचं आव्हान या प्रक्रियेतून कलाकारांना जावंच लागतं. पण तरीही पडद्यावरचा ‘देव’ होणं ही त्यांच्यासाठीही पर्वणीच ठरते!