संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाच्या कथानकावरून बरेच वाद झाले. अनेकांनी त्यावर मतं मांडली. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ‘पद्मावती’ची कथा सलीम अनारकलीच्या कथेसारखीच काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते या कथेचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही. त्याचप्रमाणे ज्यांना इतिहासाची आवड आहे, त्यांनी चित्रपट पाहण्याऐवजी पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्यातील इतिहास समजून घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘साहित्य आज तक’ या कार्यक्रमात जावेद अख्तर बोलत होते. भन्साळींच्या चित्रपटाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मी इतिहासकार नाहीये, मात्र जे प्रसिद्ध इतिहासकार आहेत किंवा जाणकार आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचल्याने मी हे सांगू शकतो. टीव्हीवरही इतिहासाच्या एका प्राध्यापकाने दिलेली माहिती मी इथे सांगू इच्छितो. ‘पद्मावती’ची रचना आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या कालावधीत फार अंतर आहे. जायसी यांनी ज्यावेळी ही कथा लिहिली तो काळ आणि खिल्जीची कारकीर्द यांच्यात जवळपास २०० ते २५० वर्षांचा फरक होता. त्यावेळी (अल्लाउद्दीनच्या कारकीर्दीत) इतिहासावर बरंच लेखन झालं. तेव्हाची सर्व माहिती उपलब्ध आहे, मात्र त्यात पद्मावतीचा उल्लेखच नाही.’

वाचा : प्रभासमुळे अनुष्काने करण जोहरची ऑफर नाकारली?

यावेळी अख्तर यांनी ‘जोधा अकबर’ या चित्रपटाचंही उदाहरण दिलं. ‘जोधा अकबरवर चित्रपट निर्मिती झाली. जोधाबाई ‘मुघल ए आजम’मध्येही होती. मात्र, जोधाबाई अकबरची पत्नी नव्हती. तो किस्सा प्रसिद्ध झाला, पण वास्तवात अकबरच्या पत्नीचं नाव जोधाबाई नव्हतं. कथा तयार केल्या जातात, त्यात काय एवढं?,’ असंही ते म्हणाले.

वाचा : चित्रपट प्रेक्षकांसाठी करायचा की मंत्रालयासाठी ? : रवी जाधव 

‘चित्रपटांना इतिहास समजू नका आणि इतिहासाची माहिती चित्रपटांमधून समजून घेऊ नका. चित्रपट पाहा आणि त्याचा आनंद घ्या. इतिहासाची आवड असल्यास गंभीरपणे त्याचं वाचन करा. अनेक इतिहासकार आहेत, त्यांची विविध विषयांवरची पुस्तकं आहेत, ती वाचा,’ असा सल्लाही त्यांनी तरुण पिढीला दिला.